रेडक्रॉस आणि रेड क्रीसेंट चळवळीचा इतिहास :

      एकोणिसाव्या शतकाच्या जवळ जवळ मध्यापर्यंत, युद्धभूमीवर जखमी झालेल्यांना सामावून घेण्यासाठी आणि उपचार करण्यासाठी कोणतीही संघटित किंवा सुस्थापित लष्करी नर्सिग व्यवस्था नव्हती, किंवा सुरक्षित वा संरक्षित संस्था देखील नव्हत्या.

      सर हेन्री ड्युनांट हे एक स्विस उद्योगपती होते. त्यांचा जन्म ८ मे १८२८ रोजी जिनेव्हा येथे झाला. सर हेन्री ड्युनंट हे व्यापारानिमित्त फिरत असता जून १८५९ मध्ये तत्कालीन फ्रेंच सम्राट नेपोलियन तिसरा यांना व्यापारासंबंधात भेटण्यासाठी इटली येथे गेले होते. त्या काळात फ्रान्स आणि इटली यांची ऑस्ट्रिया विरुद्धची लढाई २५ जून १८५९ या दिवशी सॉलफेरिनो येथे झाली. व्यापारानिमित्त फिरणारे सर हेन्री ड्युनांट त्या दिवशी संध्याकाळी सॉलफेरिनो या छोट्या शहरात पोहोचले. लढाईच्या ठिकाणावरच्या परिस्थितीचे त्यांनी निरीक्षण केले. या लढाईत एकाच दिवसात दोन्ही बाजूंचे सुमारे ४० हजार सैनिक जखमी झाले होते व त्यापैकी बरेचजण प्राणास मुकले होते. युद्धाच्या भयानक परिणामांमुळे, जखमी झालेल्या सैनिकांच्या वेदना व त्यांच्यासाठी वैद्यकीय मुलभूत काळजीचा जवळ-जवळ संपूर्ण अभाव पाहून सर हेन्री ड्युनांट यांना धक्का बसला. युद्धभूमीच्या जवळ राहून त्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी सैनिकांसाठी तातडीने मदत सेवांची व्यवस्था केली व जखमींची शुश्रूषा केली.  

      सर हेन्री ड्युनांट यांनी पाहिलेल्या सैनिकांच्या हालअपेष्टांबाबत सन १८६२ मध्ये “मेमरी ऑफ  सॉलफेरिनो” हे पुस्तक लिहिले. युद्धाच्या वेळी जखमी सैनिकांना मदत करण्यासाठी एक तटस्थ संघटना स्थापन करावी असे त्यांनी या पुस्तकात सुचवले होते. या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या केवळ एक वर्षानंतर, सन १८६३ मध्ये जिनेव्हातील उत्साही सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन त्यांनी पाच जणांचा समावेश असलेल्या एका समितीची स्थापना केली. त्या समितीचे प्रमुख सर हेन्री ड्युनांट हे होते. या समितीनेच आंतरराष्ट्रीय रेडक्रॉसची स्थापना दिनांक १७ फेब्रुवारी १८६३ रोजी केली. सर हेन्री ड्युनांट यांच्या सूचनांवर विचार करण्यासाठी जिनेव्हा येथे एका आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन दिनांक २६ ते २९ ऑक्टोबर १८६३ या काळात करण्यात आले होते. युद्धभूमीवर वैद्यकीय सेवा सुधारण्यासाठी संभाव्य उपाययोजना विकसित करण्याकरिता या परिषदेत विचार करण्यात आला. या परिषदेत ३६ व्यक्ती, राष्ट्रीय सरकारांचे १८ अधिकृत प्रतिनिधी, गैरसरकारी संस्थांचे ६ प्रतिनिधी, ७ गैर-प्रतिनिधी, आंतरराष्ट्रीय सामितीचे ५ सदस्य उपस्थित होते.

      दिनांक ८ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट १८६४ या काळात जिनेव्हा येथे रेडक्रॉस संघटनेची परिषद झाली. जगातील १६ राष्ट्रांचे प्रतिनिधी पहिल्या रेडक्रॉस परिषदेला उपस्थित होते आणि त्यांनी ऐतिहासिक पहिल्या जिनेव्हा करारावर दिनांक २२ ऑगस्ट १८६४ रोजी स्वाक्षऱ्या केल्या. आंतरराष्ट्रीय स्तरावर रेडक्रॉसची कार्यप्रणाली जिनेव्हा करारावर आधारित आहे.

      आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस व रेड क्रीसेंट चळवळ ही एक आंतरराष्ट्रीय मानवतावादी चळवळ आहे. या चळवळीत आजमितीस जगभरातील सुमारे १६ कोटी स्वयंसेवक, सदस्य आणि कर्मचारी कार्यरत आहेत. राष्ट्रीयता, वर्ण, धर्म, लिंग, वंश इत्यादींचा विचार न करता जगभरातील लोकांच्या आयुष्याचे व आरोग्याचे रक्षण करणे हे या चळवळीचे ध्येय आहे. मानवी दुःखाचा परिहार करण्याकरिता रेडक्रॉस चळवळ एक स्वयंप्रेरित आंतरराष्ट्रीय संघटना म्हणून उदयास आलेली आहे. आज जगातील जवळजवळ प्रत्येक देश या आंतरराष्ट्रीय संघटनेशी संलग्न आहे आणि या संघटनेचे बोधचिन्ह मानवी अनुकंपेचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. विना-नफा तत्वावर ही चळवळ चालते. मानवता हाच रेडक्रॉसचा धर्म आहे व  ही जगातील सर्वात मोठी मदत संस्था आहे. सन १९०१ चे शांततेचे पहिले नोबेल पारितोषिक सर हेन्री ड्युनांट यांना देण्यात आले. आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस समितीला सन १९१७ आणि १९४४ असे दोन वेळा शांततेचे नोबेल पुरस्कार देण्यात आले आणि १९६३ मध्ये पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस व रेडक्रॉस फेडेरेशन यांना नोबेल पुरस्कार देण्यात आला आहे.  

      आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस फेडेरेशन व रेड क्रीसेंट चळवळीत आज १९१ देश सदस्य आहेत. रेडक्रॉस सोसायटी ही जगातील १९१ देशांमध्ये अगण्य स्वयंसेवकांच्या सहकार्याने अखंडित सेवा देणारी एक आंतराष्ट्रीय सेवाभावी संस्था असून मानवी मूल्यांचे संरक्षण करण्याकरिता या संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे. संपूर्ण जगात इंडियन रेडक्रॉस फेडेरेशन आणि रेड क्रीसेंट यांचे सर्वात मोठे स्वयंसेवक आधारित मानवतावादी नेटवर्क आहे जे १९१ राष्ट्रीय संस्थांद्वारे दर वर्षी १६० दशलक्ष लोकांपर्यंत पोहचते.

      “८ मे” हा सर हेन्री ड्युनांट यांचा जन्मदिवस असून हा दिवस “जागतिक रेडक्रॉस दिन” म्हणून साजरा केला जातो. “माणसाच्या व निसर्गाच्या आक्रमणापासून मानवाचे रक्षण करणे हा माणुसकीचा धर्म आहे” हेच मार्गदर्शन आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस देत आहे. रेडक्रॉस मानवी मूल्यांचे जतन करण्याकरिता सदैव प्रयत्नशील असते. लीग ऑफ रेडक्रॉस मध्ये १९१  राष्ट्रातील सोसायट्या सहभागी असून त्यांचे एकूण २५ कोटी नागरिक सदस्य आहेत. “मानवता,नि:पक्षपातीपणा,तटस्थता,स्वातंत्र्य,स्वयंसेवा,एकता व विश्वव्यापकता” ही रेडक्रॉस संस्थेची मुलभूत तत्वे आहेत.

भारतात रेडक्रॉस सोसायटीची सुरुवात :

      सन १९१४ मध्ये पहिल्या महायुद्धादरम्यान, सेंट जॉन ॲम्बुलन्स असोसिएशनची एक शाखा आणि ब्रिटिश रेडक्रॉसच्या संयुक्त समितीशिवाय, भारतात बाधित सैनिकांना मदत करण्यासाठी कोणतीही संघटना अस्तित्वात नव्हती. नंतर, ब्रिटिश रेडक्रॉसच्या संयुक्त समितीची एक शाखा सेंट जॉन ॲम्बुलन्स असोसिएशनच्या सहकार्याने, पहिल्या महायुद्धाच्या भयानकतेमुळे पीडित झालेल्या सैनिकांना तसेच नागरिकांना मदत करण्यासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या मदत सेवा हाती घेण्यासाठी सुरू करण्यात आली होती. ब्रिटिश रेडक्रॉसपासून स्वतंत्र असलेल्या इंडियन रेडक्रॉस सोसायटीची स्थापना करण्यासाठीचे विधेयक दिनांक ३ मार्च १९२० रोजी भारतीय विधान परिषदेत सर क्लाऊडे हिल यांनी सादर केले, जे व्हॉईसरॉयच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य आणि भारतातील संयुक्त युद्ध समितीचे अध्यक्ष देखील होते. हे विधेयक दिनांक १७ मार्च १९२० रोजी मंजूर झाले आणि दिनांक २० मार्च १९२० रोजी गव्हर्नर जनरलच्या संमतीनंतर त्याचे कायद्यात रुपांतर होऊन, इंडियन रेडक्रॉस सोसायटी अधिनियम, १९२० (सन १९२० चा अधिनियम क्रमांक १५) अस्तित्वात आला. 

      इंडियन रेडक्रॉस सोसायटी अधिनियम, १९२०(१९२०चा अधिनियम क्रमांक १५)अन्वये भारतात सन १९२० मध्ये इंडियन रेडक्रॉस सोसायटीची स्थापना करण्यात आली. दिनांक ७ जून १९२० रोजी, इंडियन रेडक्रॉस सोसायटीची स्थापना करण्यासाठी पन्नास सदस्यांची औपचारिक नियुक्ती करण्यात आली आणि त्यांच्यामधून सर माल्कम हेली यांच्या अध्यक्षतेखाली पहिली व्यवस्थापकीय संस्था निवडण्यात आली. या संस्थेचे मुख्य कार्यालय नवी दिल्ली येथे आहे.  

      इंडियन रेडक्रॉस सोसायटी ही एक स्वयंसेवी मानवतावादी संस्था आहे, जी भारतामध्ये मानवी जीवन आणि आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी कार्य करते. या सोसायटीच्या देशभरात १२०० हून अधिक शाखा आहेत. ही संस्था आपत्ती/आपत्कालीन परिस्थितीत मदत पुरवते आणि असुरक्षित लोक आणि समुदायांच्या आरोग्याला आणि काळजी घेण्याला प्रोत्साहन देते.  ही संस्था जगातील सर्वात मोठ्या स्वतंत्र मानवतावादी संघटनेची, आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस आणि रेड क्रीसेंट चळवळीची एक आघाडीची सदस्य आहे. या चळवळीचे तीन मुख्य घटक आहेत ते म्हणजे, इंटरनॅशनल कमिटी ऑफ रेडक्रॉस (ICRC), नॅशनल सोसायटीज, आणि इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ रेडक्रॉस अँड रेड क्रीसेंट सोसायटीज हे होत.  

      इंडियन रेडक्रॉस सोसायटी अधिनियामांनुसार राष्ट्रीय स्तरावर भारताचे माननीय राष्ट्रपती हे या सोसायटीचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत आणि माननीय केंद्रीय आरोग्य मंत्री हे या सोसायटीचे चेअरमन आहेत. उपाध्यक्षांची निवड व्यवस्थापकीय मंडळाच्या सदस्यांद्वारे केली जाते. राष्ट्रीय व्यवस्थापकीय मंडळात १८ सदस्य असतात. चेअरमन आणि ६ सदस्य राष्ट्रपतींद्वारे नामनिर्देशित केले जातात. उर्वरित १२ सदस्य राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या शाखांद्वारे एका निवडणूक मंडळाद्वारे निवडले जातात. व्यवस्थापन मंडळ अनेक समित्यांद्वारे सोसायटीच्या कार्यांचे प्रशासन आणि देखरेख करण्यासाठी जबाबदार आहे. सरचिटणीस हे सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.

रेडक्रॉसचे चिन्ह :

      “पांढऱ्या पार्श्वभूमीवरील रेडक्रॉस” हे रेडक्रॉसचे चिन्ह आहे, जे सन १८६४ मध्ये युद्धभूमीवर वैद्यकीय मदत पथकांसाठी विशिष्ट चिन्ह म्हणून ओळखले जात असे.

      रशिया-तुर्की युद्धात ऑट्टोमन साम्राज्याने रेडक्रॉस ऐवजी रेड क्रीसेंटचा वापर केला. इजिप्तने देखील रेड क्रीसेंटचा पर्याय निवडला तर पर्शियाने पांढऱ्या पार्श्वभूमीवरील लाल सिंहाचा पर्याय निवडला. ही चिन्हे १९२९ च्या जिनेव्हा अधिवेशनात लिहिली गेली आणि स्वीकारली गेली. इंडियन रेडक्रॉस सोसायटीने मात्र पांढऱ्या पार्श्वभूमीवरील रेडक्रॉसला त्यांचे प्रतीक म्हणून स्वीकारले आहे.

इंडियन रेडक्रॉस सोसायटी जिल्हा शाखा जळगावची स्थापना :

      मानवी मूल्यांचे जतन व पीडितांची सेवा या मूळ उद्देशातून इंडियन रेडक्रॉस सोसायटी जिल्हा शाखा जळगावची स्थापना केली गेली आणि दिनांक १३ जुलै १९५३ रोजी बॉम्बे सार्वजनिक विश्वस्तव्यवस्था अधिनियम, १९५० च्या तरतुदीनुसार, सहायक धर्मादाय आयुक्त, नाशिक विभाग यांचेकडून इंडियन रेडक्रॉस सोसायटी जिल्हा शाखा जळगावची नोंदणी करण्यात आली. जनसेवेच्या व राष्ट्रीय सेवाभावी कार्याच्या प्रेरणेतून अनेक सेवाभावी व्यक्तींनी अथक परिश्रम घेऊन दिनांक १७ डिसेंबर १९६३ रोजी संस्थेच्या जुन्या इमारतीत जिल्हा शाखेच्या कार्यास सुरुवात केली होती. श्री. अप्पासाहेब पटवर्धन यांनी त्यांच्या पत्नी कैलासवासी गिरिजाबाई पटवर्धन यांच्या स्मरणार्थ रेड क्रॉस जळगाव शाखेच्या सभागृहाच्या बांधकामास देणगी दिली व त्यातून कै. गिरिजाबाई पटवर्धन सभागृह बांधण्यात आले. तत्पूर्वी, सन १९३७ पासून शासकीय रुग्णालय, जळगाव या ठिकाणी रेडक्रॉस जळगाव शाखेची  छोट्या स्वरुपात सुरुवात झालेली होती असे जुन्या अहवालावरून दिसते.

      रेडक्रॉस जळगावच्या प्रवर्तकांना सुरुवातीस अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. यात प्रामुख्याने जागा, साहित्य व आर्थिक स्थिती या गोष्टी होत्या. परंतु आपल्या मातृभूमीतील  पीडित जनतेची सेवा करण्यासाठी एक सामाजिक कर्तव्य या दृष्टीने सेवाभावाचे व्रत घेतलेल्या त्या काळच्या पदाधिकाऱ्यांनी आपले तन-मन-धन एकवटून संस्थेच्या विकासासाठी जिद्दीने प्रयत्न केले. तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी शहरातील प्रत्येक गल्लीबोळात, प्रत्येक घराघरात फिरून संस्थेच्या उभारणीकरिता, आर्थिक मदतीसाठी, सहकार्याची हाक दिली. या हाकेस जनसामान्यांनी देखील प्रतिसाद दिला व सहकार्य म्हणून त्याकाळी एक-पाच-दहा रुपयांची निधी तिकिटे विकत घेऊन संस्थेच्या आर्थिक उभारणीस फार मोलाचे सहकार्य दिले. यातूनच हळूहळू संस्थेच्या विकासाला व प्रगतीला चालना मिळत गेली आणि जनसेवेच्या समाधानाचं सार्थक त्यांच्या चेहऱ्यावर दिसू लागलं. जनतेचा प्रतिसाद आणि पदाधिकाऱ्यांची एकजूटीने काम करण्याची कार्यपद्धती यामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण होऊन एकंदरीत पीडितांसाठी सामान्य लोकोपयोगी निरनिराळ्या योजना आकार घेऊन अस्तित्वात येऊ लागल्या. या योजनांचा भाग म्हणून अनेक नैसर्गिक आपत्तीत रेडक्रॉस जळगाव शाखेने आपत्ती ग्रस्तांना मदतीचा हात देऊ केला जेणेकरून त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल.

इंडियन रेडक्रॉस सोसायटी जिल्हा शाखा जळगावच्या वाटचालीतील काही महत्वाचे टप्पे :

      जिल्हा शाखेकडून सन १९५९ मध्ये एदलाबाद चोंगरी येथे आलेल्या महापुरातील आपत्ती ग्रस्तांना भरीव मदत करण्यात आली.  

      सन १९७२ मध्ये महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात भयंकर दुष्काळ पडला असतांना रेडक्रॉस जिल्हा शाखेने जनतेला पाव, टोस्ट व बिस्किटे पुरवली. 

      सन १९८१ मध्ये अकुलखेडा येथील आपद् ग्रस्तांना धान्य व दुध पावडरच्या डब्यांचे वाटप  शाखेतर्फे करण्यात आले.

      सन १९९१ मध्ये वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे झालेल्या वित्तहानीत शाखेने मदत फेरी काढून व दानपेट्यांद्वारे निधी जमा करून तो पूरग्रस्त निधी म्हणून संबंधितांना दिला. तसेच,  निधी जमवून भूकंपग्रस्त भागातील लोकांना देखील मदत करण्यात आली.

     सन १९९२ मध्ये पडलेल्या दुष्काळात रेडक्रॉस शाखेला नार्वे व कॅनडाकडून आलेल्या सुक्या खाद्य पदार्थ, कपडे, धान्य, इत्यादी वस्तूंचे वाटप गरजू जनतेला करण्यात आले. तसेच, नांद्रे या गावी गरीब मुलांना गणवेश वाटप करण्यात आले. अशाप्रकारे जळगाव रेडक्रॉस शाखेचे कार्यकलाप कालानुरूप वाढतच गेले.

      लोकांच्या जीवनमानात आधुनिकतेच्या परिप्रेक्षात अनेक बदल होत गेले. जीवनमानात झालेल्या बदलामुळे अनेक नवीन आव्हाने उभी राहत गेली. त्या आव्हानांना सामोरे जातांना माणसाच्या आरोग्याच्या बाबतील देखील अनेक गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण होऊ लागले. ते प्रश्न सोडविणे पूर्वीच्याकाळी कठीणप्राय होते, परंतु तंत्रशास्त्रातील प्रगतीमुळे मोठ्या व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करणे आता सहज शक्य झालेले आहे. मोठ्या व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया तसेच काही दुर्घर रोग यांमुळे पीडित व्यक्तीच्या शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी होते आणि अशा रुग्णांना रक्ताची अत्यंत गरज भासते व ही गरज नियमित आणि योग्य वेळेत पूर्ण होणे अतिशय आवश्यक असते. तंत्रज्ञानात कितीही प्रगती झालेली असली तरी आजपर्यंत मानवी रक्ताला कोणताही पर्याय मिळालेला नाही ही वस्तुस्थिती आहे. रक्ताची गरज लक्षात घेता जळगाव शाखेच्या तत्कालीन कार्यकारिणीने अथक परिश्रमातून तयार केलेल्या रक्तपेढीचे दिनांक २३ ऑक्टोबर १९८० रोजी तत्कालीन राज्यपाल  माननीय श्री. सादिक अली यांच्या शुभहस्ते उदघाटन करून, रक्तपेढीचे लोकार्पण करण्यात आले. ही रक्तपेढी बॉम्बे अन्न व औषध प्रशासन नियम, १९५० या नियमांनुसार नोंदणीकृत  केलेली असून ती नियमांनुसार कार्यरत आहे.

      काळानुरूप आवश्यक अशा अद्ययावत रक्तपेढीची गरज लक्षात घेता जिल्हा शाखेच्या  विस्तारित वास्तूच्या बांधकामास सन १९९६ मध्ये सुरुवात करण्यात आली. सन १९९६ हे इंडियन रेडक्रॉस सोसायटी महाराष्ट्र राज्य शाखा, मुंबई यांचे अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरे करण्यात आले होते व त्या निमित्ताने आपल्या जळगाव शाखेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमांचा एक भाग म्हणून आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून जळगाव शाखेच्या कार्याचा अहवाल कार्यकारिणी सदस्य डॉ. विजय चौधरी यांनी प्रसारित केला होता. यावेळी रेडक्रॉस शाखा आणि जळगाव जिल्हा अपंग कल्याण व पुनर्वसन सहकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने “रक्तदान श्रेष्ठदान” या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते व स्पर्धेत विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.जे.राठोड यांचे हस्ते प्रशस्तीपत्रके देऊन गौरविण्यात आले होते. त्याचप्रमाणे रक्तदान शिबिराचे आयोजन देखील करण्यात आले होते. महत्वाचे म्हणजे या शिबीरात कार्यकारिणी सदस्यांनी देखील रक्तदान केले होते. या प्रसंगी विक्रमी रक्तदाते व रक्तदान शिबिर आयोजकांचा तत्कालीन नगराध्यक्षांच्या हस्ते सन्मान करण्यात आला होता. याच वर्षात जळगावला नव्याने बदलून आलेले जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एस.के.बनसोडे यांचे रक्तपेढीस बहुमोल सहकार्य मिळाले. तत्कालीन नगराध्यक्ष श्री. बंडूदादा काळे यांनी रक्तपेढीच्या विस्तारित बांधकामास नगरपरिषदेतर्फे विनामूल्य पाणीपुरवठा करून मोलाचे सहकार्य केले. याच काळात नियमित विद्युत पुरवठा सुरु राहावा या दृष्टीकोनातून 10KVA चे जनरेटर शाखेकडून खरेदी करण्यात आले. जळगाव शाखा त्यावेळी रक्त नमुन्यांची एचआयव्ही व कावीळची चाचणी शासकीय रुग्णालय जळगाव यांच्याकडून करून घेत होती व त्यामुळे रुग्णांना वेळेवर रक्त पुरवठा करायला खूप अडचणी येत होत्या. या अडचणींचा सामना करण्यासाठी या चाचण्या करण्याकरिता लागणारे मान्यता प्राप्त “एलायझा रिडर मशीन” खरेदी करून रक्तपेढी स्वयंपूर्ण करण्यात आली. याच काळात शाखेची रक्तपेढी उत्कृष्ठ कार्य करीत नाशिक विभागात दुसऱ्या क्रमांकावर होती. रक्ताची वाढती मागणी लक्षात घेऊन “वाढदिवसाला रक्तदान” ही संकल्पना तत्कालीन उपाध्यक्ष डॉ.प्रभाकर अच्युतराव खटावकर यांच्या संकल्पनेतून उदयास आली. या संकल्पनेला अनेकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यामुळे रक्ताचा साठा मुबलक ठेवण्यास मदत झाली होती.

      सन १९९९-२००० मध्ये कारगिल युद्धातील भारतीय शहीद जवानांसाठी उभारण्यात आलेल्या कारगिल फंडास शाखेतर्फे रकम रुपये १०,००१ चा मदत निधी पाठविण्यात आला होता .

      दिनांक ७ एप्रिल २००० रोजीच्या जागतिक आरोग्य दिनानिमित्त तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गुलाबराव मराठे, अप्पर जिल्हाधिकारी श्री. कादरी साहेब, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.व्ही.व्ही.चौधरी यांच्या हस्ते “Safe blood Starts with me”, हे घोषवाक्य असलेल्या स्टिकर्सचे अनावरण करण्यात येऊन ते स्टिकर्स शहरातील चौका-चौकात व विविध वाहनांवर प्रदर्शित करण्यात आले होते.  

      प्रगत विज्ञान व तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विविध आजारांमध्ये विविध रक्त घटकांचा वापर करून रुग्णांना बरे होण्यास तत्काळ मदत होऊ शकते हे विचारात घेऊन रक्तपेढीत Component Therapy Unit स्थापन करण्यात आले. या युनिटमध्ये  आवश्यक ती यंत्रसामग्री  बसविण्यात आली. या युनिटचे उदघाटन दिनांक २२ एप्रिल २००० रोजी श्री. सुरेशदादा जैन, सौ. डॉ. चंद्राविश्वनाथन (संचालिका,मुंबई) व तत्कालीन नगराध्यक्ष श्री. चतुर्भुज सोनवणे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. याचवेळी “रक्तघटक व त्यांचा वापर” या विषयावर जळगाव शहरातील डॉक्टरांसाठी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सहकार्याने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक २४ जून २००० रोजी अन्न व औषध प्रशासन आणि  सर्व रक्तपेढ्या यांच्या संयुक्त विद्यमाने Blood Transfusion and  Component Use या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते व या कार्यक्रमासाठी डॉ. झरीन भरुचा विभाग प्रमुख टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई व अध्यक्ष मुंबई शहर रक्तपेढी असोशिएशन, जिल्हा शल्य चिकित्सक, सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन यांचे मोलाचे सहकार्य मिळाले होते.

      अभिमानाची गोष्ट म्हणजे आपल्या जळगाव शाखेस सन २००० चा राज्यस्तरीय रक्तदाता मेळावा आयोजनाचा बहुमान मिळाला होता. महाराष्ट्र असोशिएशन ऑफ ब्लड बँक आणि रेडक्रॉस रक्तपेढी जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने, हा मेळावा दिनांक ३ डिसेंबर २००० रोजी समारंभपूर्वक अनेक मान्यवर, महाराष्ट्रातील अनेक  रक्तपेढ्यांचे संचालक आणि ऐच्छिक रक्तदाते यांच्या उपस्थितीत संपन्न झाला होता. यावेळी संचालकांचा व विक्रमी रक्तदात्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. या मेळाव्यास महाराष्ट्र असोशिएशन ऑफ ब्लड बँकचे अध्यक्ष डॉ.एस.एम.नाटेकर व त्यांचे सहकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

      दिनांक २६ जानेवारी २००१ रोजी गुजरात राज्यात झालेल्या विनाशकारी भूकंपातील आपदग्रस्तांच्या मदतीसाठी डॉक्टरांचे एक पथक शाखेकडून पाठविण्यात आले होते. तसेच, जनतेला आवाहन करून जमा झालेले कपडे व औषधींचा साठा आपदग्रस्तांना पाठविण्यात आला  होता. त्याचप्रमाणे शाखेतर्फे रकम रुपये १२०००/- चा डिमांड ड्राफ्ट भूकंप मदत निधीस देण्यात आला. या ठिकाणी गरजूंना रक्त व रक्तघटक यांची आवश्यकता लक्षात घेऊन विविध सेवा संस्थांना आवाहन करून रक्तदान शिबिरांचे आयोजन देखील शाखेतर्फे करण्यात आले होते.

      सन २००२ मध्ये शाखेच्या रक्तपेढीत रक्त नमुन्यांचे बिनचूक क्रॉस मॅचिंग जेल  टेक्नॉलॉजि” ही आधुनिक व अद्ययावत यंत्र सामग्री व साहित्य कार्यान्वित करण्यात आले.

      राष्ट्रीय उपक्रमाअंतर्गत, दिनांक ९ ऑगस्ट २००२ रोजी क्रांती दिनानिमित्त सामाजिक सलोखा म्हणून जामनेर येथे भारतीय जैन संघटना जामनेर, जामनेरचे नागरिक आणि जळगाव विभाग पोलीस यांच्या विशेष सहकार्याने सर्व धर्मिय रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले  होते.

      सामाजिक उपक्रमाअंतर्गत तत्कालीन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष डॉ. संजय मुखर्जी यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली “पाणी आडवा पाणी जिरवा” या पाणी पुनर्भरण कार्यक्रमात शाखेने सहभाग घेतला होता. सन २००३ मध्ये महाराष्ट्र असोशिएशन ऑफ ब्लड बँक यांच्या महाराष्ट्रातील रक्तपेढ्यांचे तृतीय वार्षिक अधिवेशन घेण्याचा बहुमान आपल्या जळगाव शाखेला मिळाला. हे अधिवेशन जळगाव  शहरातील अतिशय रम्य ठिकाण “जैन व्हॅली” येथे दिनांक १८ व १९ जानेवारी २००३ रोजी अतिशय भव्य-दिव्य स्वरुपात संपन्न झाले. या मेळाव्यास महाराष्ट्रातील बहुसंख्य रक्तपेढ्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. प्रशिक्षण, मार्गदर्शन, चर्चासत्र, विकसित तंत्रज्ञानाचे आदान-प्रदान, मनोरंजन अशा विविध सत्रातून हा मेळावा यशस्वी रीतीने पार पडला.

      मुंबई येथे लिंबडी अजरामर संप्रदाय तर्फे दिनांक १ जून २००३ रोजी विराट रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते ज्याची गिनिज बुक मध्ये नोंद केली गेली. या शिबिरात एकाच दिवसात १५००० रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले होते. अशा या विराट रक्तदान शिबिरात आपल्या शाखेच्या रक्तपेढीस आमंत्रित करण्यात आले होते.  

      सन २००३ मध्ये जळगाव महानगरपालिकेतर्फे आयोजित संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानात आपल्या शाखेने मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता. जळगाव जिल्हा अपंग कल्याण व पुनर्वसन सहकारी संस्थेच्या विशेष सहकार्याने इयत्ता १० वी आणि इयत्ता १२ वीच्या परीक्षेत विशेष प्राविण्य मिळविलेल्या अंध,अपंग,मूक-बधीर विद्यार्थ्यांचा यथोचित गौरव करण्यात आला होता.

      सन २००४ मध्ये आपल्या रक्तपेढीचे उत्कृष्ट सेवाभावी कार्य पाहून इंडियन रेडक्रॉस सोसायटी शाखा पुणे यांनी त्यांच्याकडील टेम्पो ट्रॅक्स गाडी आपल्या शाखेस भेट म्हणून दिली. या गाडीमुळे रक्तदान शिबिराचे आयोजन व रक्त संकलन कार्यास अधिक चालना मिळाली. या वर्षापासून १०० टक्के ऐच्छिक रक्तदाते मिळविण्याचा संकल्प करण्यात आला. रक्तपेढीतील सर्व फ्रीज व उपकरणांचे तापमान नियमित नियंत्रित करणे आवश्यक असल्याने त्यांचे एकत्रितपणे तापमान नोंद करण्यासाठी “सेंट्रल मॉनिटरींग सिस्टीम” ही अद्ययावत यंत्र सामग्री कार्यरत करण्यात आली.     

      दिनांक ३० मे २००५ रोजी सुरत (गुजरात) येथे सुरत डायमंड असोशिएशन यांनी आयोजित केलेल्या भव्य रक्तदान शिबिरात आपल्या शाखेने सहभाग घेऊन ५०० रक्तपिशव्या संकलित केल्या होत्या. या शिबिरात एका दिवसात २२००० रक्तदात्यांनी रक्तदान केले होते, ज्याची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद घेतली गेली. तसेच, सन २००५ मध्ये दक्षिण भारतात सुनामीमुळे आलेल्या नैसर्गिक आपत्तीत आपत्तीग्रस्त झालेल्या लोकांसाठी शाखेतर्फे रकम रुपये १११११/- चा धनादेश देण्यात आला होता.

      डॉ.जयंत जहागीरदार प्रतिष्ठानतर्फे लेवा बोर्डिंग या ठिकाणी आरोग्यासंबंधी आयोजित केलेल्या “आरोग्यम-२००५” या तीन दिवसीय शिबिरात “रक्तदान व रक्तपेढीची गरज” या विषयी मार्गदर्शन करण्यासाठी स्टॉल लावण्यात आला होता.

      कोरिया येथील रेडक्रॉस सोसायटीने त्यांच्या स्थापनेस १०० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्व रेडक्रॉस सोसायटींच्या सहकार्याने “रक्तदान” या विषयावरील पोस्टर स्पर्धा आयोजित केली होती. जळगाव जिल्ह्यातील कला महाविद्यालये, शालेय विद्यार्थी व नागरिक यांच्याकरिता आयोजित केलेल्या स्पर्धेतील ५ उकृष्ट पोस्टर्स या स्पर्धेकरिता पाठविण्यात आले होते.  

      दिनांक २३ जानेवारी २००६ ते १५ फेब्रुवारी २००६ या दरम्यान राज्य शाखा, मुंबई यांच्या मार्गदर्शन व सहकार्याने ध्वजदिन सप्ताह साजरा करण्यात आला होता. विविध शैक्षणिक संस्थांमध्ये ध्वजदिन पोस्टर्स व माहिती पत्रके यांचे वाटप करून ध्वजदिन निधी संकलित करण्यात आला व जमा झालेला रकम रुपये ६५००/- चा निधी अपंग विद्यार्थी मदत निधीत जमा करण्यात आला.

      दिनांक १डिसेंबर या जागतिक एड्स दिनानिमित्त शासकीय रुग्णालय, प्रादेशिक परिवहन कार्यालय व जळगाव महानगर पालिका यांच्या सहकार्याने राष्ट्रीय महामार्गावर एड्स बाबत मार्गदर्शन करण्यासाठी भव्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रिक्षा चालक, ट्रक चालक यांची नेत्र तपासणी करण्यात येऊन त्यांना एड्स बाबत मार्गदर्शन करण्यात आले.

      तत्कालीन माननीय जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष श्री. विजय सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शासकीय रुग्णालय, जिल्हा अरोग्य विभाग, जिल्हा परिषद यांच्या सहकार्याने “बर्ड फ्ल्यू” व “चिकनगुनिया” अभियानात शाखेतर्फे जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. राज्य शाखा मुंबई यांचेकडून आलेले पोस्टर्स व माहिती पुस्तके यांचे जिल्हाभरात वाटप करण्यात आले. प्रत्येक गावोगावी,बस डेपो,रेल्वे स्टेशन,आठवडे बाजार या ठिकाणी पोस्टर्स लावण्यात आले. शासकीय रुग्णालयाच्या सहकार्याने शहरातील विविध प्रभागात (वार्ड) चिकन गुनियाच्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले. या जनजागृतीपर उपक्रमाची आंतराराष्ट्रीय रेडक्रॉसकडून दखल घेण्यात येऊन त्यांचेकडून आपल्या शाखेस गौरविण्यात आले.

      चोपडा येथील महापुरात सापडलेल्या पूरग्रस्तांची चोपडा येथे जाऊन भेट घेऊन त्यांना संसारोपयोगी साहित्यांचे वाटप शाखेतर्फे करण्यात आले. पूरग्रस्तांची आरोग्य तपासणी करून त्यांना औषधी वाटप देखील करण्यात आले. या बाबत राज्य शाखा, मुंबई यांच्याशी संपर्क करण्यात आल्याने राज्य शाखेने  ७ ट्रक भरून साहित्य जळगाव शाखेकडे पाठवले, ज्यात तंबू, ब्लॅकेटस्, चादरी, कपडे, औषधी, भांडी-कुंडी इत्यादी होते. ते सर्व साहित्य चोपडा येथे जाऊन आपद ग्रस्तांना वाटप करण्यात आले. याप्रसंगी राज्य शाखा मुंबईच्या कार्यकारिणी सदस्या सौ.ज्योती तिजोरीवाला प्रामुख्याने उपस्थित होत्या. या कार्यक्रमास चोपडा रेडक्रॉसचे पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांचे विशेष सहकार्य मिळाले.

      अन्न व औषध प्रशासन यांच्या  मार्गदर्शनाखाली आपल्या शाखेत अफेरेसीस युनिट तयार करण्यात आले. या युनिटचे निरीक्षण आयुक्त श्री.ज.शे.पोळ व औषधी निरीक्षक श्री.सुरेश अग्रवाल यांनी केले. या युनिटकरिता २१ लाख रुपये किंमतीचे अफेरेसीस मशीन व सेल काउंटर शाखेकडून खरेदी करण्यात आले. या अफेरेसीस युनिटच्या मशीनचे उदघाटन दिनांक ९ फेब्रुवारी २००८ रोजी रेडक्रॉसच्या राष्ट्रीय अध्यक्ष तथा महामहीम राष्ट्रपती सौ. प्रतिभाताई पाटील यांच्या  शुभहस्ते संपन्न होऊन सदर युनिटचे  रुग्णांच्या सेवेसाठी लोकार्पण करण्यात आले. या युनिटमुळे जळगाव, धुळे, नंदुरबार, बुलढाणा, खंडवा, बऱ्हाणपूर जिल्ह्यातील रुग्णांना लाभ मिळत आहे. या युनिटची जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती पोहचावी म्हणून स्पान हेल्थ केयर प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहकार्याने दिनांक ९ नोव्हेंबर २००८ रोजी  जळगाव, धुळे, नंदुरबार, बुलढाणा, खंडवा, बऱ्हाणपूर जिल्ह्यातील विशेषज्ञ डॉक्टरांसाठी एका वैद्यकीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत डॉ.संजय जाधव, सहाय्यक संचालक, राज्य रक्त संक्रमण परिषद, मुंबई व डॉ. राजेश सावंत अक्ट्रक्ट हॉस्पिटल, मुंबई यांची “रक्त घटक व प्लेटलेट घटक यांचा वापर” याविषयी मार्गदर्शनपर व्याख्याने संपन्न झालीत.

      जळगाव शाखेच्या दैनंदिन कामात व सेवेत गतिमानता, गुणवत्ता, शिस्तबद्धता व पारदर्शकता येण्याकरिता आय.एस.ओ. प्रणालीप्रमाणे कामकाजव्यवस्थेत आवश्यक त्या सुधारणा करून, आय.एस.ओ. मानांकन कसोटीत यशस्वी होऊन ९००१-२००० हे पहिले आय.एस.ओ.  मानांकन शाखेस मिळाले व अथक परिश्रमाने त्यात सातत्य ठेवल्याने ९००१-२००८ मानांकन आपल्या शाखेस दुसऱ्यांदा प्राप्त झाले. आय.एस.ओ. मानांकन मिळवणारी जळगाव शाखा ही इंडियन रेडक्रॉस सोसायटी संचलित भारतातील कदाचित पहिलीच रक्तपेढी असावी.

      सेंट जॉन ॲम्बुलन्स असोशिएशन जळगाव शाखेचे बंद पडलेले काम सुरु करण्याच्या दृष्टीने राज्य शाखा, मुंबई यांच्याशी तत्कालीन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष श्री. कुणालकुमार यांच्या मार्गदर्शनाने पत्र व्यवहार करून सेंट जॉन ॲम्बुलन्स असोशिएशन जळगाव शाखेचे बंद पडलेले काम पूर्ववत सुरु करण्यात आले. रक्तपेढीचे चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी यांनी “युनिक ब्लड डोनर कार्ड” ही संकल्पना पन्हाळा येथे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र असोसिएशन ऑफ ब्लड बँकच्या मेळाव्यात मांडली. त्या ठिकाणी उपस्थित सर्व रक्तपेढ्यांना ही संकल्पना खूप आवडली व या सभेत त्या संकल्पनेस स्वीकृती देण्यात येऊन तसा ठराव देखील पारित करण्यात आला.  

      दिनांक २५ जानेवारी २००९ रोजी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येस न भूतो न भविष्यती अशा “रक्तदान जनजागृतीपर सवाद्य चित्ररथ रॅलीचे” आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत हत्ती,घोडे,रक्तदानाचा संदेश देणारा चित्ररथ,लेझीम पथक,शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन युवक,ॲम्ब्युलन्सचा ताफा,अनेक रिक्षा व नागरिक सहभागी झाले होते. रॅलीत विक्रमी रक्तदाते घोड्यावर आरूढ होते. हा चित्ररथ दिनांक २६ जानेवारी २००९ रोजी प्रजासत्ताक दिनाच्या संचालनात सहभागी करण्यात आला व पुढील ८ दिवस तो संपूर्ण जळगाव जिल्ह्यात फिरविण्यात आला होता.

      दिनांक ११ जून २०१० रोजी अजिंठा शासकीय विश्रामगृह येथे शाखेने खरेदी केलेल्या  “ब्लडडोनर मोबाईल व्हॅन” चे विधिवत उदघाटन महामहीम राष्ट्रपती सौ. प्रतिभाताई पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. या प्रसंगी महामहीम राष्ट्रपती सौ. प्रतिभाताई पाटील, खास उपस्थित असलेले राज्य शाखेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे राज्यपाल माननीय के. शंकर नारायणन यांचा संस्थेच्या वतीने स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास विशेष विनंतीवरून राज्य शाखेच्या मानद सचिव श्रीमती होमई मोदी,राज्य रक्त संक्रमण परिषदेचे सहाय्यक संचालक डॉ. संजय जाधव उपस्थित होते.   

      महाराष्ट्र राज्य सुवर्ण महोत्सवानिमित्त शिवसेना मुंबई व राज्य रक्त संक्रमण परिषद मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १ मे २०१० च्या महाराष्ट्र दिनी गोरेगाव, मुंबई येथे महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात महाराष्ट्रातील ८४ रक्तपेढ्या सहभागी झाल्या होत्या. या शिबिरात आपल्या शाखेच्या रक्तपेढीला देखील सहभागी होण्याचा मान मिळाला. सदरहू शिबिरात आपण जिल्ह्यातील रुग्णांकरिता ५०० रक्त पिशव्यांचे  संकलन केले. या प्रसंगी शाखेच्या वतीने डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी यांनी “इमर्जन्सी ब्लड बँक ॲडॉप्शन” या  संकल्पनेचे निवेदन दिले व ही संकल्पना सर्वांना  खूप आवडली.

      आपल्या शाखेतर्फे दिनांक १३ मे २०११ पासून तत्कालीन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष श्री. निरंजनकुमार सुधांशू यांच्या मार्गदर्शनाने प्रत्येक रक्तदात्याचा ५०,००० रुपये रकमेचा “अपघात विमा पॉलीसीचा” प्रारंभ करण्यात आला. या योजनेचे प्रायोजकत्व गणपती हॉस्पिटलचे डॉ.शीतल ओसवाल यांनी स्वीकारले. परमपूज्य श्री.श्री.रविशंकरजी(Art of Living) यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ही योजना सुरु करण्यात आली. दिनांक ९ ऑगस्ट २०११ रोजी क्रांती दिनानिमित्त महिलांकरिता महा-रक्तदान शिबिराचे आयोजन करून त्यात महिलांचे हिमोग्राम व प्लेटलेट मोजण्यात आले. क्रांती दिनानिमित्त रेमन मॅगेसेसे पुरस्कार प्राप्त माननीय नीलिमा मिश्रा यांचा आपल्या शाखेच्यावतीने भव्य सत्कार करण्यात आला.

      धनत्रयोदशी ते विवेकानंद जयंती, म्हणजे दिनांक १२ जानेवारी २०१२ पर्यंतच्या स्वेच्छा रक्तदात्यांना व रक्तदान शिबिर आयोजकांना “रक्तदाता सदस्य परिवार विवेकानंद दैनंदिनी २०१२” ही माहितीपर सचित्र दैनंदिनी तयार करून तिचे वाटप करण्यात आले. या दैनंदिनीकरिता अनेक दानशूर व्यक्तींनी स्वेच्छा देणग्या दिल्या.

      जळगाव जिल्ह्यातील डॉक्टरांकरिता रक्त व रक्तघटकांचा वापर या विषयी तत्कालीन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष श्री. राजूरकर यांचे अध्यक्षतेखाली दिनांक ११ डिसेंबर २०१२ रोजी व जळगावचे तत्कालीन जिल्हा शल्य-चिकित्सक डॉ. आर.के.शेळके यांचे अध्यक्षतेखाली २७ जुलै २०१४ रोजी वैद्यकीय क्षेत्रातील रक्त व रक्तघटक संक्रमणातील नामवंत तज्ज्ञांचे  उपस्थितीत वैद्यकीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत डॉ. राजेश सावंत (मुंबई), डॉ. जीवन चौधरी (पुणे), डॉ. आनंद चाफेकर (पुणे), डॉ. पुर्णिमा राव (पुणे), डॉ. महेंद्रसिंग चव्हाण (औरंगाबाद), डॉ. विवेकानंद कुळकर्णी (जळगाव) यांनी मार्गदर्शन केले होते.

      जागतिक रक्तदाता दिनाचे औचित्य साधून दिनांक १४ जून २०१४ रोजी रिगल टॉकिज या ठिकाणी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत विक्रमी रक्तदाते,रक्तदान शिबिर आयोजक, व थॅलेसेमिया रुग्णांच्या पालकांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. या वेळी थॅलेसेमिया बाल रुग्णांना “तारे जमीन पर” हा चित्रपट दाखविण्यात आला.

    “कॅन्सर संजीवनी प्रकल्प” या अंतर्गत जागतिक कर्करोग दिनानिमित्त कॅन्सर संजीवनी गृप व चांडक कॅन्सर केयर यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक ४ फेब्रुवारी २०१४ रोजी शालेय स्तर व खुल्या गटासाठी भव्य मॅरेथॉन स्पर्धा व कॅन्सर रोगावरील उपचारांबाबत प्रभावी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन कांताई सभागृह येथे करण्यात आले होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून डॉ. रितू बियाणी व डॉ.निलेश चांडक यांचे मार्गदर्शन मिळाले. या कार्यक्रमात त्यांनी ३०,००० रुपयांचे आर्थिक सहकार्य केले. या उपक्रमास ‘आम्ही मैत्रिणी’ या कॅन्सर सपोर्ट गृप व युवाशक्ती फाउंडेशन यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.

      जनतेला उत्तम दर्जाची औषधी स्वस्त दरात मिळावी म्हणून भारत सरकार पुरस्कृत “जेनेरीक मेडिसीन प्रकल्प” रेडक्रॉस जळगावमार्फत मार्च २०१५ पासून सुरु आहे. रेडक्रॉसच्या अंतर्गत जेनेरिक औषधीची सेवा, दीर्घायु दवाखाना, ओम मेडिकल स्टोअर्स, जय नगर, ओंकारेश्वर मंदीराजवळ, जळगाव येथे गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर दिनांक २१ मार्च २०१५ सुरू करण्यात आला. कालांतराने या प्रकल्पाअंतर्गत फुलफगर फार्मा, विसनजी नगर; केदारनाथ मेडिकल स्टोअर्स, रेडक्रॉस भवन, सिव्हील हॉस्पिटल रोड; आयुष मेडिकल स्टोअर्स, गुरुदत्त नगर; गितेश मेडिकल स्टोअर्स, ओमशांती नगर, पिंप्राळा या ठिकाणी सर्व सामान्य जनतेला नामवंत कंपन्यांची जेनेरिक औषधी स्वस्त दरात उपलब्ध करून दिली जात आहे. या सर्व मेडिकल स्टोअर्समध्ये  जेनेरीक औषधांवर किमंतीच्या ६० ते ७० टक्के सवलत, स्टॅंडर्ड औषधांवर ५ ते १० टक्के सवलत व आयुर्वेदिक औषधी सवलत दिली जाते.

      रेडक्रॉस जळगाव शाखेने जनतेसाठी धर्मार्थ दवाखाने जळगाव शहरात सुरु केलेले आहेत. रेडक्रॉस संचलित पाटील धर्मार्थ दवाखाना, वाघनगर;  रेडक्रॉस दवाखाना, पिंप्राळा; व रेडक्रॉस दवाखाना, रेडक्रॉस भवन येथे सर्व प्रकारच्या आजारांवर उपचार केले जात आहेत. गंभीर आजाराच्या रुग्णांना पुढील उपचारार्थ विविध शासकीय आरोग्य योजनांचा लाभ मिळण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात येते.

      दिनांक ८ मे २०१७ रोजीच्या जागतिक रेडक्रॉस दिनानिमित्ताने रेडक्रॉसचे तत्कालीन अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी श्री. किशोर राजे निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाने जळगाव शहरात “सेवाकलाविष्कार” या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाअंतर्गत काव्यरत्नावली चौकातील भाऊंचे उद्यान व उद्यानासमोरील  रस्त्याच्या पश्चिमेकडे असलेल्या भिंतीच्या लगत रस्त्याच्या बाजूने ३ फूट उंचीचे १००० फुट लांब सरळ महाबळ रोडपर्यंत कॅनव्हास कापड लावण्यात आले होते व त्या कॅनव्हास कापडावर एकाच वेळी २०० निवडक नामवंत चित्रकार आपली कला सादर करतांनाचे दृश्य जळगावकरांना पहिल्यांदाच पाहायला मिळाले.  

      जळगाव शाखा करीत असलेल्या सामाजिक कार्याचा  विचार करून  महाराष्ट्र शासनाचे क्रीडा व युवक सेवा संचालनालय,महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव यांच्यावतीने दिला जाणारा सन २०१७-१८ या वर्षीचा जिल्हा युवा पुरस्कार इंडियन रेडक्रॉस सोसायटी जिल्हा शाखा जळगावला १ मे २०१८ या महाराष्ट्र दिनाच्या दिवशी प्रदान करण्यात आला. समाजसेवेचे ब्रीद अंगीकारून समाजोपयोगी  विविध कार्यांमध्ये अग्रेसर राहणार्‍या  जळगाव जिल्हा रेडक्रॉस शाखेला सर्वोत्कृष्ट शाखेचा “राजा महाराजसिंग फिरता चषक” आणि सन्मान स्मृति चिन्ह पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. राज्य रेडक्रॉस सोसायटी, मुंबई यांनी जळगाव शाखेने सन २०१५ ते २०१७ या कार्यकाळात केलेल्या कार्याची दखल घेवून दिनांक १० मे २०१८  रोजी त्या संस्थेच्या वार्षिक बैठकीत  हा पुरस्कार जळगाव शाखेला प्रदान केला.

      केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, दिव्यांग सशक्तीकरण विभाग अंतर्गत दिव्यांगांच्या सर्वांगिण पुनर्वसनार्थ जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र, हे जिल्हास्तरावरील केंद्र, इंडियन रेडक्रॉस सोसायटी जळगाव शाखेने माहे जानेवारी २०१८ पासून चालविण्यास हाती घेतले आहे. सदर केंद्रामार्फ़त जिल्ह्यातील दिव्यांगांचे शारीरिक, मानसिक, आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक पुनर्वसनाचे कार्य चालते. रेडक्रॉस संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या उल्लेखनीय सेवा कार्यामुळे सन २०१९ चा “दिव्यांग प्रेरणा पुरस्कार” या केंद्रास देण्यात आला आहे.

      इंडियन रेडक्रॉस सोसायटी जिल्हा शाखा जळगाव रक्तपेढीत “ल्युको रिडक्शन मशीन” चा विधिवत उदघाटन सोहळा तत्कालीन जिल्हाधिकारी तथा माजी अध्यक्ष श्री. किशोर राजे निंबाळकर (भा.प्र.से.) यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. सुरक्षित  रक्तपुरवठा  करण्याच्या दृष्टीने एक पाऊल म्हणून बायोरॅड कंपनीचे जर्मन बनावटीचे ऑटोमॅटिक एलायझा रिडरचे लोकार्पण करण्यात आले. टेरिमो पेनपॉल कंपनीचे अद्ययावत तंत्रज्ञान असलेले एस.डी.पी. युनिट (प्लेटलेट मशीन) रेडक्रॉस रक्तपेढीत दाखल झाले. दर्जेदार रक्त घटकांच्या निर्मितीकरिता जर्मन बनवटीचे हेटीच (Hettich) कंपनीचे रेफ्रीजरेटेड सेण्ट्रिफ्यूज, अनावश्यक सैनिक पेशी काढून टाकणारे टेरिमो पेनपॉल कंपनीचे ल्युको रीडक्शन यूनिट, रक्तदात्यांच्या रक्त दोषाचे अचूक निदान करणारे इव्होलीस प्लस (Evolis plus) कंपनीचे स्वयं चलित एलायझा रिडर व सोबतीला बायोरॅड कंपनीचे जागतिक दर्जाचे किट्स, यांची भर रक्तपेढीत सन २०१८ मध्ये झाली.  

      रेडक्रॉस जळगाव शाखेतर्फे शासकीय व निमशासकीय कार्यालये, कंपन्या, कारखाने इत्यादि ठिकाणी कामगारांना आवश्यक असलेल्या मान्यता प्राप्त प्रथमोपचार प्रशिक्षणाचे वर्ग आयोजित करण्यात येऊन कामगारांना तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून प्रशिक्षित करण्यात येते. यात विविध कंपनीतील  कर्मचारी व विविध समाजसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी प्रशिक्षण घेतलेले आहे व घेत आहेत.      

      रेडक्रॉस राज्य शाखा मुंबई आणि इंडियन रेडक्रॉस सोसायटी जिल्हा शाखा जळगाव तर्फे जळगाव जिल्ह्यातील ५० गरजू शाळा आणि आश्रम शाळा यांना संपूर्ण साहित्यासह प्रथमोपचार पेटी तयार करून देण्यात आली जेणेकरून शालेय परिसरात एखादी घटना घडल्यास त्वरित प्राथमिक उपचार करता येणे शक्य होईल. तसेच या प्रथमोपचार पेटीत असलेल्या सर्व साहित्याच्या वापराबाबत संपूर्ण माहिती प्रथमोपचार प्रशिक्षण समितीचे तत्कालीन चेअरमन यांनी संबंधितांना दिली.

      जळगाव रेडक्रॉस शाखेच्या इमारतीच्या नूतनीकरणाला ऑक्टोबर, २०१५ मध्ये सुरुवात झाली आणि २०१८ अखेरीस ते काम पूर्ण झाले.  दिनांक १ जानेवारी २०१९ हा दिवस जळगाव रेडक्रॉसच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिला जाणारा असा दिवस आहे. या दिवशी शाखेने अत्याधुनिक, भव्य व सुसज्ज अशा नवीन वास्तूमध्ये (रेडक्रॉस भवन) नव्या जोमाने सेवेला सुरुवात केली आहे.

      माहे जानेवारी ते जून २०१९ या कार्यकाळात रेडक्रॉस जळगाव शाखेची रक्तपेढी ही महाराष्ट्रातील सर्व रेडक्रॉस शाखांच्या रक्तपेढ्यांमध्ये सर्वात जास्त रक्त संकलन व वितरण करणारी रक्तपेढी ठरली. रक्तपेढीच्या क्षेत्रातील जागतिक पातळीवरचे उच्च तंत्रज्ञान म्हणजेच नॅट टेस्टेड तंत्रज्ञान वापरून (Nucleic Acid Test (NAT) रक्त पुरवठा करणारी संपूर्ण खान्देशातील पहिलीच रक्तपेढी म्हणून “रेडक्रॉस रक्तपेढी” नावारूपाला आली आहे. जानेवारी २०१९ पासून रक्तपेढीमध्ये रोश कंपनीचे नॅट टेस्टेड युनिट कार्यान्वित झाले व यासंबंधी रक्तपेढीतील तंत्रज्ञांना प्रशिक्षण देण्यात आले होते. या तंत्रज्ञानामुळे सर्वाधिक सुरक्षित रक्तपुरवठा शाखा करू शकली. आता शाखेकडून जानेवारी २०२५ पासून संभाजीनगर येथील श्री.दत्ताजी भालेराव यांच्या रक्तपेढीत ब्लड सॅपल नॅट टेस्टिंगकरिता पाठविले जाते व त्यानंतर नॅट टेस्टेड रक्त जळगाव रेडक्रॉस रक्तकेंद्रात गरजूंना उपलब्ध करून दिले जाते.

      सन २०२० मध्ये चीन देशात कोरोना विषाणूच्या साथीने हाहाकार उडाला होता. जागतिक आरोग्य संघटनेने या विषाणूमुळे होणाऱ्या आजाराचे अधिकृत नामकरण “कोविड-१९” असे केले. दिनांक ८ मार्च २०२० पर्यंत या साथीची लागण जगभरात १,०५,५८६ नागरिकांना  झाली होती आणि  या साथीत ४,०२७ इतके मृत्यू झाले होते. चीनमधील हुबेई प्रांतात उद्भवलेला हा संसर्गजन्य रोग १०० देशांच्या सीमा ओलांडून गेला. भारतात केरळमध्ये या कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला त्यांनतर दिल्ली व तेलंगणात प्रत्येकी एक रुग्ण आढळले असल्याची माहिती समोर आली. दिल्लीतील कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाला तो इटलीत असताना लागण झाली होती तर दुसऱ्या रुग्णाला दुबईत लागण झाल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले होते. महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा उद्रेक दिनांक ९ मार्च २०२० रोजी सुरू झाला.

      दिनांक १३ मार्च रोजी महाराष्ट्र शासनाने कोरोना विषाणूचा उद्रेक पाहता महाराष्ट्रात महामारी रोग अधिनियम, १८९७ च्या तरतुदी लागू केल्या. या दिवशी महाराष्ट्र राज्यात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे होणाऱ्या साथीच्या आजाराची पहिली नोंद झाली. दिनांक १७ मार्च २०२० रोजी महाराष्ट्रात पहिल्या कोरोनाबाधित व्यक्तीच्या मृत्यूची नोंद झाली. तात्काळ या कोरोना व्हायरस संबंधी माहिती आणि सूचना सर्व जिल्ह्यांना पाठविण्यात आल्या. जळगाव जिल्ह्यात माहिती मिळताच इंडियन रेडक्रॉस सोसायटी जळगाव शाखेमार्फत विविध उपक्रमांची आखणी करण्यात आली. साधारणत: १५ मार्चपर्यंत सर्व सूचना मिळताच शाखेकडून कोरोनाबाबत जनजागृतीचे काम हाती घेण्यात आले आणि प्रत्येक लहान मोठ्या गावांपर्यंत कोरोनाबाबत माहिती पोहोचविण्यासाठी पोस्टर्स बनविण्यात आलेत. संपूर्ण कोरोना काळात जळगाव रेडक्रॉसचे पदाधिकारी, कर्मचारी आणि स्वयंसेवक अतिशय जबाबदारीने आणि समाजाप्रती असलेल्या कर्तव्य भावनेने काम करीत होते त्यामुळे  जिल्ह्यात कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यात आणि कोरोना रुग्णांना सेवा देण्यात रेडक्रॉस कार्य करु शकली.

      कोरोना काळात रेडक्रॉस जळगाव शाखेने उल्लेखनीय सेवाकार्य केले. तारा लॅबच्या  सहकार्याने विनामूल्य करोना तपासणी साने गुरुजी वाचनालयात करण्यात आली व तिचा बहुसंख्य नागरिकांनी लाभ घेतला होता. इंडियन रेडक्रॉस सोसायटी जळगाव मार्फत विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात आले होते आणि अनेक उपक्रमांच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातील नागरिकांना सेवा देण्याचा प्रयत्न करण्यात आला. यात “फिरता दवाखाना व औषधोपचार” अंतर्गत विनामूल्य आरोग्य तपासणी, गरजूंना किराणा साहित्याची मदत,संस्थांमार्फत तयार जेवण वाटपासाठी स्वयंसेवकांची मदत, श्री ओसवाल सुखशांती संघ यांच्या सहकार्याने “अन्न हे पूर्ण ब्रह्म” कम्युनिटी किचन, कोरोना-१९ रुग्णांना नाश्ता, फळे, जेवण वाटप, आर्सेनिक अल्बम ३० या होमिओपॅथी औषधीची निर्मिती व वाटप, रेडक्रॉस व इकरा कॉलेज यांचे डेडीकेटेड कोविड सेंटर, कोविड रुग्णांच्या उपचारासाठी प्लाझ्मा डोनेशनचा सेवा उपक्रम, महाराष्ट्रातील पहिल्या अँटीबॉडी तपासणी केंद्रांचा शुभारंभ या प्रमुख उपक्रमांचा समावेश होता. जानेवारी महिन्याच्या सुरुवाती पासून जळगाव जिल्ह्यात रेडक्रॉस लसीकरण केंद्रामार्फत लसीकरण मोहीम सुरु केली गेली होती. बंद पडलेल्या इकरा हॉस्पिटल जळगावला रेडक्रॉस शाखेतर्फे १०० बेड सर्वोतोपरी तयार करून देण्यात येऊन ऑक्सिजन पाईप लाईन बसवून देण्यात आली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्या सहकार्याने रेडक्रॉस भवन येथे लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले होते. अतिशय शिस्तबध्द नियोजन,  सोशल डीस्टन्सिंगचे पालन करून नागरिकांना बसण्याची सुविधा, चार रजिस्ट्रेशन टेबल, दिव्यांग बांधवांना विनाविलंब लसीकरण व्यवस्था,  रोज सॅनिटायजर व्यवस्था, गर्दी टाळण्यासाठी लस उपलब्धतेनुसार कुपन व्यवस्था  अशा सर्व सोयी सुविधांसह नागरिक या लसीकरणाचा लाभ घेत होते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, पोलीस प्रशासन आणि इंडियन रेडक्रॉस सोसायटी जळगाव शाखा यांच्या सहकार्याने पोलीस मल्टीपर्पज हॉल येथे पोलीस बांधवांच्या परिवारासाठी सर्व सोयींनीयुक्त लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले होते. तसेच “लसीकरण केंद्र आपल्या दारी” अंतर्गत फिरते लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले होते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव शहर महानगरपालिका आणि रेडक्रॉस शाखा जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कोविड-१९ अॅन्टीजन विनामूल्य तपासणी केद्र सुरु करण्यात आले होते. एमआयडीसी येथील जिंदा भवन येथे देखील अॅन्टीजन तपासणी केंद्र सुरु करण्यात आले होते. रेडक्रॉस शाखेच्या सहकार्याने जळगाव शहरातील विविध भागात अॅन्टीजन तपासणी शिबीरे देखील घेण्यात आली होती.

      इंडियन कौन्सिल मेडिकल रिसर्च, भारत सरकार यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आणि अन्न औषध प्रशासनाच्या परवानगीने रेडक्रॉस रक्तपेढीतर्फे कोविड आजारातून बरे झालेल्या रुग्णांचा प्लाझ्मा दान करून घेणे व तो प्लाझ्मा मागणीनुसार कोरोनाग्रस्त रुग्णांना पुरविणे या कार्यास सुरुवात करण्यात आली होती. रुग्णांना उपचारासाठी व कृत्रिम ऑक्सिजन देण्यासाठी इंडियन रेडक्रॉस सोसायटी जिल्हा शाखा जळगावने चाळीस लाख रुपये खर्च करून खरेदी केलेले २०  ड्युरा सिलेंडर शाखेकडून रुग्णसेवेसाठी समर्पित केले गेले. कोरोना रिपोर्ट बाबतीतचे पुणे येथील क्लाऊड पॅथॉलॉजी सॉफ्टवेयर जळगाव शाखेने खरेदी केल्यामुळे रुग्णांना फक्त  सहा तासात त्यांच्या मोबाईलवर मॅसेजद्वारे तपासणी अहवाल पाठविणे शक्य झाले.  हा अत्यंत महत्वाचा विषय मार्गी लागल्यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय टाळता आली व रुग्णांवर त्वरित उपचार सुरु झाल्यामुळे अनेक कोरोना रुग्णांचे प्राण वाचविण्यास मदत झाली. नंतर हे सॉफ्टवेयर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील RT-PCR प्रयोगशाळेला आपल्या शाखेकडून देणगी स्वरुपात देण्यात आले. रेडक्रॉस जळगाव शाखेच्या वतीने रेडक्रॉस ऑक्सिजन बँक देखील  सुरु करण्यात आली होती. या २०  ड्युरा सिलिंडरच्या उपक्रमानंतर ८६ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर रुग्णसेवेला समर्पित करण्यात आले होते जे आजही गरजू जनतेच्या सेवेत आहेत.

      कोविड काळामध्ये, चाळीसगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे अनेक परिवारांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. बरेच परिवार उघड्यावर पडले होते.  शाखेने अनेक दानशूर दात्यांच्या सहयोगाने अशा प्रत्येक आपत्तीग्रस्त परिवाराला २० भांडे असलेला सेट, चटई, बादली, किराणा सामान (साखर, चहा पावडर, डाळ, शेंगदाणे, तांदुळ, तेल, मीठ, गहू पीठ) ताडपत्री, लायटर, खाकरा, लोणचे, पाणी बॉटल, आवश्यक औषधी इत्यादी साहित्यांचे १५० किटचे वाटप केले. तसेच जामनेर तालुक्यातील आपत्तीग्रस्त गावांमध्ये जाऊन अत्यावश्यक १८ वस्तूंचे किट तयार करुन ७५ कुटुंबांना देण्यात आले. या सोबतच गर्भवती महिला, लहान बालके व इतर नागरिकांसाठी रॅपटाकोस कंपनीचे रोगप्रतिकारशक्ती वाढविणारी औषधे, प्रोटीन पावडर, रक्तवाढीची औषधे देखील डॉक्टरांच्या मदतीने देण्यात आली.

      दरवर्षी दिनांक ८ मे हा दिवस जागतिक थॅलेसेमिया दिवस म्हणून साजरा केला जातो. दिनांक ८ मे २०२२ हा दिवस रेडक्रॉस जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रात दिव्यांग बांधवांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. जागतिक थॅलेसेमिया दिनानिमित्त उपचार दिल्या जाणाऱ्या बालकांसाठी विशेष उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले. आठ दिवसीय या उन्हाळी शिबिरामध्ये विविध प्रकारचे खेळ, थेरपी, आणि शारीरिक व्यायामासाठी उपयुक्त गोष्टी बालकांना शिकविण्यात आल्या. या शिबिरामध्ये ७० दिव्यांग बालकांनी सहभाग घेतला होता.  

      सन २०२२ मध्ये इंडियन रेडक्रॉस सोसायटी जळगाव शाखेमार्फत रेडक्रॉस ऑर्थोपेडीक लायब्ररी सुरु करण्यात आली. TEAM ONE CONSULTANT यांच्याकडून देणगी स्वरुपात ऑर्थोपेडीक साहित्य प्राप्त झाले. या लायब्ररीतून रुग्णांसाठी मोठे बेड, लहान बेड, व्हील चेअर, वॉकर, कमोड चेअर, आधार काठी (stick) इत्यादी साहित्य फक्त डिपॉझीट रक्कम जमा करून वापरासाठी दिले जातात.

      महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल श्री. भगतसिंह कोश्यारी हे कार्यक्रमानिमित्त जळगाव येथे दोन दिवसीय दौऱ्यावर आले असताना इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत रेडक्रॉस जळगाव शाखेच्या सुरु असलेल्या कामकाजाबद्दल सविस्तर चर्चा केली.

      इंडियन रेडक्रॉस सोसायटी जिल्हा शाखा जळगावच्या वतीने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहाला सॅनिटरी वेंडिंग मशीन भेट देण्यात आली. मुलींना व महिलांना आरोग्याविषयी जागरूक करणे व मार्गदर्शन करणे यासाठी रेडक्रॉस मार्फत नेहमीच असे उपक्रम राबविले जात असतात.

      सन २०२३ मध्ये इंडियन रेडक्रॉस सोसायटी जिल्हा शाखा जळगाव मार्फत कांताई हॉल या ठिकाणी एक दिवसीय “ज्येष्ठ नागरिक श्रेष्ठ नागरिक स्नेह मेळाव्याचे” आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात ५०० जेष्ठ नागरिकांनी भाग घेतला होता. या उपक्रमासाठी रतनलाल सी.बाफना फाउंडेशनचे सहकार्य लाभले होते.

      रेडक्रॉस जळगाव मार्फत पर्यावरण पूरक उपक्रम हाती घेतले जातात. यात प्रत्येक रक्तदात्याला रक्तदान केल्यानंतर झाडाचे रोप देऊन सन्मानित करणे, ठिकठिकाणी वृक्षारोपण करणे, वृक्षांचे कोणत्याही बाबतीत नुकसान होणार नाही याची काळजी घेणे, पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही या बाबत जागरूकता, अशा अनेक प्रकारचे उपक्रम नियमित राबविले जातात.   

      पर्यावरण सुरक्षेबाबत विद्यार्थ्याना शाळेतूनच सवय लागावी या उद्देशाने सागर मित्र, सामनेर या संस्थेचे श्री. विशाल सोनकुळ, यांच्या सहकार्याने जळगाव शहरातील विविध शाळेतून प्लास्टिक केर कचरा जमा करून त्याची योग्यरीत्या विल्हेवाट करणेबाबतचे कार्य दिनांक २० मे २०२३ पासून रेडक्रॉस जळगाव शाखेने सुरू केलेले आहे. जळगाव शहर आणि जवळपासच्या तालुक्यातील अनेक शाळा व हजारों विद्यार्थी या उपक्रमात जोडले गेले असून नियमित स्वरुपात प्लॅस्टिक कचरा संकलन केले जाते.

      केंद्र शासनाच्या “स्वच्छ भारत अभियान” या अभियानाअंतर्गत दिनांक २० मे २०२३ रोजी जळगांव शहर महानगपालिका आणि इंडीयन रेडक्रॉस सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात तीन ठिकाणी आर.आर.आर. संकलन केंद्र रेडक्रॉस भवन, सिव्हील हॉस्पिटल रोड, जळगाव, रेडक्रॉस दवाखाना, बाजार रोड, पिंप्राळा, जळगाव, रेडक्रॉस पाटील धर्मार्थ दवाखाना, गुरुदत्त नगर, वाघनगर स्टॉप, जळगाव येथे सुरु करण्यात आले आहे. या केंद्रांत  जुनी पुस्तके, कपडे,पादत्राणे, घरातील इतर जुन्या वस्तू संकलित करून या वस्तूंचे नूतनीकरण, पुनर्वापर आणि नवीन उत्पादने तयार करणे असा उपक्रम आहे. या अंतर्गत आपल्या घरातील जुन्या सायकल, अर्धवट वापरलेल्या वह्या, जुनी पुस्तके, कपडे,  घरातील जुने पंखे, कॉम्प्यूटर, मॉनिटर, जुनी खेळणी इत्यादी पुनर्वापर होणाऱ्या वस्तू जमा केल्यास या वस्तू दुरुस्त करून अनेक गरजू नागरिकांना, विद्यार्थ्यांना वितरित करून त्यांना मदत करणे शक्य होईल.

      वरील कार्याव्यतिरिक्त इतर अनेक कार्य रेडक्रॉस जळगाव शाखेमार्फत केली जातात. कॅनडियन रेडक्रॉसच्या माध्यमातून आणि राष्ट्रीय शाखा नवी दिल्ली व राज्य शाखा मुंबई यांच्या सहकार्याने रेडक्रॉस जळगाव शाखेला अद्ययावत तंत्रज्ञानाने परिपूर्ण अशी मेडिकल व्हॅन मिळाली असून या व्हॅनच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यात विविध ग्रामीण व आदिवासी भागात आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केली जातात. 

      विश्वबंधुत्व, मानवता आणि सेवाभावनेचे संस्कार हे शालेय जीवनापासूनच  विद्यार्थ्यांमध्ये रुजावेत आणि आपल्या सामाजिक जबाबदारीची जाणीव त्यांना व्हावी या उद्देश्याने शाळा व महाविद्यालयांमध्ये ज्युनियर/युथ रेडक्रॉसची स्थापना करण्यात येते. या अंतर्गत आरोग्य-सेवा आणि मैत्री या सिद्धांतावर आधारित उपक्रम राबविले जातात. रेडक्रॉस जिल्हा शाखेमार्फत लासगाव आणि पाथरी गावांमधील शाळेत, केंद्रीय विद्यालय, आय.एम.आर कॉलेज जळगाव,शास्त्री कॉलेज ऑफ फार्मसी, एरंडोल, डॉ.प्रकाशचंद जैन होमिओपॅथी मेडिकल  कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च, पळासखेडा जामनेर,  गोदावरी कॉलेज ऑफ फिजिओथेरपी जळगाव, आणि अँड.सीताराम आनंदरामजी बाहेती कॉलेज,जळगाव येथे युथ रेडक्रॉस शाखा सुरु करण्यात आल्या आहेत व लवकरच अनेक शाळा व महविद्यालयांमध्ये युथ रेडक्रॉस शाखा सुरु करण्यात येणार आहेत.

      केंद्र व राज्य सरकारचा उपक्रम असलेले “आपले सरकार सेवा केंद्र” आणि “ई सेतु व आधार सुविधा केंद्र” रेडक्रॉस जळगाव शाखेमध्ये सुरू करण्यात आले होते.  या केंद्रामार्फत आजपर्यंत अनेक नागरिकांना आधारकार्डची सेवा देण्यात आली व अनेकांनी सेतू केंद्रामधील विविध सुविधेचा लाभ घेतला.

      रेडक्रॉसच्या माध्यमातून रेडक्रॉस भवन येथे फिजिओथेरपी सेंटर सुरू करण्यात आले आहे. विविध प्रकारच्या आजारांवरील उपचार करण्यासाठी फिजिओथेरपीची आवश्यकता असते. यामध्ये पाठदुखी, मानदुखी, कंबरदुखी, सांधेदुखी, गुडघेदुखी, न्यूरो फिजिओथेरपी, अर्धांगवायू, मुलांसाठी फिजिओथेरपी यांचा समावेश आहे. ही सेवा अत्यल्प दरात सुरु असून  अपंग व्यक्तींना मोफत फिजिओथेरपी सेवा दिली जाते.

      दिनांक ७ एप्रिल २०२४ रोजी  रेडक्रॉस राज्य शाखा मुंबई यांच्या प्रयत्नातून आणि India Ratings & Research A Fetch Group Company, Mumbai या कंपनीच्या सी.एस.आर. देणगीतून एरंडोल तालुक्यात डॉ. किरण पाटील यांच्या “आई हॉस्पिटल” मध्ये रेडक्रॉस जळगाव शाखेमार्फत ब्लड स्टोरेज सेंटर सुरु करण्यात आले आहे.

      दिनांक २२ एप्रिल २०२५ रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्यात २६ नागरिकांची निर्घृण हत्त्या करण्यात आल्याने भारताने “ऑपरेशन सिंदूर” मधून जगभरात दहशतवाद विरोधात कठोर संदेश दिला आहे. भारताच्या सैनिकांच्या शौर्य आणि समर्पणाला श्रद्धांजली वाहतांना स्वैच्छिक रक्तदानाला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच ऑपरेशन सिंदूर मधील सैनिकांच्या सन्मानार्थ इंडियन रेडक्रॉस सोसायटी जिल्हा शाखा जळगाव यांनी दिनांक ८ मे २०२५ पासून २४ मे २०२५ पर्यंत मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिरांचे आयोजन केले होते. या शिबिरांमध्ये मानवी सेवा आणि देशभक्तीची भावना जागवत १६०८ रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे.

      दिनांक १६ जून २०२५ रोजी कोल्हापूर येथील “सावली केअर सेंटर” या सेवाभावी संस्थेचे संचालक श्री. किशोरजी देशपांडे यांनी रेडक्रॉस जळगावला भेट देऊन कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या मान्यवरांना केअर सेंटरच्या कार्याची ओळख करून दिली. “सावली केअर सेंटर” ही संस्था शारीरिक वा मानसिक परावलंबितता आलेल्या व्यक्तींची सेवा, शुश्रूषा करण्याचे कार्य गेल्या दोन दशकांपासून अखंडपणे करीत आहे, तसेच अनेक सामाजिक प्रकल्प देखील राबवित आहे. सावली केअर सेंटर सारखा प्रकल्प जळगाव मध्ये राबविण्याचा विचार रेडक्रॉस जळ गाव शाखा करीत आहे. 

      इंडियन रेडक्रॉस सोसायटी जिल्हा शाखा जळगावच्या रक्तकेंद्रात नुकताच रोचे कंपनीचे केमील्युमीनेसन्स एनालाइझर (Cobas-e 411 & Roche) या अत्याधुनिक रक्त तपासणी यंत्राचा समावेश करण्यात आलेला आहे. या यंत्रामुळे रक्त तपासणीसाठी लागणारा वेळ कमी होऊन रक्तातील विषाणू संसर्ग शोधकालावधी देखील कमी होऊन त्वरित रक्त घटक उपलब्ध होणार आहेत. दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी या यंत्राचे उदघाटन रेडक्रॉसचे अध्यक्ष जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद आणि त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ. इंद्राणी मिश्रा यांचे हस्ते करण्यात आले. तसेच, त्याच दिवशी निमखेडी शिवारात रेडक्रॉस संचलित पाचव्या रेडक्रॉस दवाखान्याचे  उद्घाटन करण्यात येऊन रुग्ण सेवा सुरु करण्यात आलेली आहे.  

      दरवर्षी रेडक्रॉस शाखा जळगाव तर्फे अनेक विशेष दिवस साजरे केले जातात. उदाहरणार्थ १२ जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा दिन; २६ जानेवारी रोजी भारतीय प्रजासत्ताक दिन; ८ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन; ७ एप्रिल रोजी आरोग्य दिन; ८ मे रोजी जागतिक रेडक्रॉस दिन; ८ मे रोजी जागतिक थॅलेसेमिया दिन; १२ मे रोजी जागतिक परिचारिका दिन; ३१ मे रोजी जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन;  ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिन; १४ जूनला जागतिक रक्तदाता दिन; २१ जून रोजी आंतराष्ट्रीय योग दिन; १ जुलै रोजी जागतिक डॉक्टर दिन; १३ जुलै इंडियन रेडक्रॉस सोसायटीचा वर्धापन दिन; ३ ऑगस्ट रोजी जागतिक अवयव दिन; १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन; १३ सप्टेबर रोजी जागतिक प्रथमोपचार दिन; १ ऑक्टोबर रोजी स्वेच्छा रक्तदान दिन; ३ डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग दिन, साजरे होत असतात.