जागतिक थॅलेसेमिया दिवस :
थॅलेसेमिया हा रक्ताचा एक विकार आहे. थॅलेसेमिया हा विकार मुलांना त्यांच्या पालकांकडून होतो, म्हणजेच, थॅलेसेमिया हा एक अनुवंशिक आजार आहे. थॅलेसेमिया ची लक्षणे मुलाच्या जन्मानंतर काही महिन्यांनी दिसू लागतात. यामध्ये लाल रक्तपेशींची झपाट्याने घट होते. सामान्यतः शरीरातील लाल रक्तपेशींचे आयुष्य सुमारे १२० दिवसांचे असते. परंतु थॅलेसेमिया झालेल्या रुग्णाच्या शरीरातील लाल रक्तपेशींचे आयुष्य केवळ २० दिवसांचे असते. अशा परिस्थितीत दर २० ते २५ दिवसांनी या रुग्णांना बाहेरून रक्त द्यावे लागते. या आजारावर योग्य उपचार न केल्यास तो मृत्यूचे कारणही ठरू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. या आजाराबाबत लोकांना जागरूक करण्यासाठी दरवर्षी ८ मे रोजी जागतिक थॅलेसेमिया दिन साजरा केला जातो. ८ मे हा रेडक्रॉसचे जनक हेन्री ड्युनंट यांचा जन्मदिन असल्याने तो दिवस जागतिक रेडक्रॉस दिन देखील आहे.
जागतिक थॅलेसेमिया दिनाचा इतिहास :
जागतिक थॅलेसेमिया दिन पहिल्यांदा १९९४ मध्ये साजरा करण्यात आला. थॅलेसेमिया इंटरनॅशनल फेडरेशनचे अध्यक्ष आणि संस्थापक जॉर्ग एंग्लेजॉस यांनी या आजाराने ग्रस्त असलेल्या सर्व रुग्ण आणि त्यांच्या पालकांच्या सन्मानार्थ या दिवसाची सुरुवात केली. या आजाराबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा थॅलेसेमिया दिन साजरा करण्यामागील मुख्य उद्देश होता.
थॅलेसेमियाचे दोन प्रकार :
थॅलेसेमिया या आजाराचे थॅलेसेमिया मायनर आणि थॅलेसेमिया मेजर असे दोन प्रकार आहेत. जेव्हा दोन विवाहित जोडीदारांपैकी एकामध्ये दोषपूर्ण गुणसूत्र असतात, तेव्हा मुलाला किरकोळ थॅलेसेमिया होतो. मायनर थॅलेसेमियामध्ये रुग्ण सामान्य माणसांप्रमाणे जीवन जगू शकतो. जेव्हा पती-पत्नी दोघांच्या गुणसूत्रांमध्ये दोष असतो, तेव्हा त्यांच्या मुलाला मेजर थॅलेसेमिया होतो. अशा स्थितीत मेजर थॅलेसेमिया असलेल्या त्या मुलाला बाहेरून वारंवार रक्त घ्यावे लागते.
थॅलेसेमियाची लक्षणं :
थॅलेसेमिया आजाराची लक्षणं अगदी सामान्य आहेत. थॅलेसेमिया झालेल्या मुलाला सतत अशक्तपणा जाणवणे, थकल्यासारखे वाटणे, ओटीपोटीत सूज येणे, गडद लघवीला होणे, त्वचेवर पिवळसर रंग येणे, त्याचबरोबर नखे, डोळे आणि जीभ फिकट होणे, मुलाची वाढ मंदावणे अशी काही लक्षणं दिसून येतात.
थॅलेसेमिया आजारावर उपचार :
थॅलेसेमिया आजारावर बोन मॅरो ट्रान्सप्लांट हा एकमेव उपचार मानला जातो. परंतु हे दुर्दैव आहे की केवळ २० ते ३० टक्के रुग्णांना त्यांच्या कुटुंबाकडून एचएलए आयडेंटिकल डोनर मिळू शकतो. ७०टक्के रुग्णांमध्ये रक्तगटाच्या अभावी उपचार होऊ शकत नाहीत व अशा वेळी रुग्णांना वेळोवेळी रक्त द्यावे लागते.
