विशेष मुलांच्या पालकांसाठी विशेष कार्यशाळा

“पालक सक्षम तर विशेष मुलांचे भविष्य अधिक सक्षम!” या विचारातून इंडियन रेडक्रॉस सोसायटी जिल्हा शाखा जळगाव संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र (DDRC), जळगाव यांच्या वतीने विशेष मुलांच्या पालकांसाठी “ग्रुप थेरपी व ताण व्यवस्थापन (Stress Management)” या विषयावर विशेष कार्यशाळेचे आयोजन रेड क्रॉस भवन येथे दिनांक १३ जुलै २०२६ रोजी करण्यात आले. विशेष मुलांचे संगोपन करताना पालकांना अनेक भावनिक, मानसिक, शारीरिक व सामाजिक आव्हानांना सामोरे जावे लागते. मुलांचे उपचार, शिक्षण, वर्तनातील बदल, भविष्याची चिंता तसेच दैनंदिन जबाबदाऱ्या यामुळे पालकांवर मोठा मानसिक ताण येत असतो. अशा परिस्थितीत स्वतःचे मानसिक व शारीरिक आरोग्य जपणे, सकारात्मक दृष्टीकोन ठेवणे आणि तणावाचे योग्य व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक आहे या दृष्टीकोनातून पालकांना ताण-तणावाचे प्रभावी व्यवस्थापन, सकारात्मक विचारसरणी, भावनिक संतुलन, योग व प्राणायामाचे महत्त्व, दैनंदिन जीवनात सहज करता येणारी श्वसन तंत्रे यातून मानसिक ताणाचे व्यवस्थापन कसे करावे तसेच विशेष मुलांचे संगोपन करतांना ते अधिक संयमाने, आत्मविश्वासाने आणि आनंदाने कसे करावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ श्री. धनंजय जकातदार, यांनी या कार्यशाळेत केले.