जागतिक महिला दिनानिमित्त गोदावरी महाविद्यालयाच्या युथ रेडक्रॉस शाखेअंतर्गत “इमोशनल इंटेलिजंस” या  विषयावर महत्वपूर्ण व्याख्यानाचे आयोजन

जळगाव – जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून गोदावरी नर्सिंग कॉलेजच्या युथ रेडक्रॉस शाखेअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी “इमोशनल इंटेलिजंस” या विषयावर एम.जे. कॉलेज सेंटर ऑफ एक्सलंसच्या डायरेक्टर आणि रेडक्रॉस ज्युनियर-युथ रेडक्रॉस समिती अध्यक्ष डॉ. शमा सराफ यांचे माहितीपर व्याख्यान आयोजित करण्यात आले. या प्रसंगी रेडक्रॉस चेअरमन डॉ. मंगला ठोंबरे, जनसंपर्क अधिकारी सौ. उज्वला वर्मा, महाविद्यालाचे प्राचार्य, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

 या बाबत माहिती देताना डॉ. शमा सराफ यांनी सांगितले की, प्रत्येक माणसाची  समजण्याची व समजून घेण्याची क्षमता वेगवेगळी असते. बऱ्याच वेळी आपण आपल्या मनातील व इतरांच्या मनातील भावना  योग्य पद्धतीने न समजल्यामुळे आयुष्यात मोठा गोंधळ निर्माण होतो. याचा आपले आयुष्य, सामाजिक व कौटुंबिक जीवन, नातेसंबंध, व्यवसाय यावर परिणाम होतो. त्यामुळे परिस्थिती समजून घेत, स्व-परीक्षण करत, प्रसंगावधान लक्षात घेत स्वतः मध्ये बदल करून घेणे आवश्यक आहे. या संबंधी त्यांनी काही प्रश्न विद्यार्थ्यांना विचारत स्व-परीक्षण करण्याबाबत माहिती दिली. रेडक्रॉस चेअरमन डॉ. मंगला ठोंबरे यांनी या उपक्रमाच्या आयोजनाबद्दल व महिला दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. या उपक्रमाच्या सहकार्यासाठी गोदावरी नर्सिंग कॉलेजच्या वतीने रेडक्रॉसचे आभार  व्यक्त करण्यात आले.