रेडक्रॉस मार्फत धनाजी नाना महाविद्यालयाच्या वतीने पाल येथे आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन

इंडियन रेडक्रॉस सोसायटी मार्फत धनाजी नाना महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत  पाल, तालुका रावेर येथे आयोजित निवासी शिबिरात रक्तदान शिबिर आणि आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. यात १३ विद्यार्थ्यांनी रक्तदान केले आणि ७० विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी करण्यात आली. या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात रेडक्रॉस रक्तकेंद्राचे चेअरमन डॉ.प्रसन्नकुमार रेदासनी यांनी विद्यार्थ्यांना रक्तदानाबाबत सविस्तर माहिती देत जास्तीत जास्त महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी रक्तदान करण्याबाबत आवाहन केले. धनाजी नाना विद्याप्रबोधिनी संस्थेचे उपाध्यक्ष आणि रेडक्रॉस कार्यकारिणी सदस्य श्री. सुनील पाटील यांनी विद्यार्थांना निरोगी व सकारात्मक जीवन जगण्याबाबत मार्गदर्शन केले. समाजकार्य विद्यालयाचे प्राचार्य डॉ. राकेश चौधरी यांनी रेडक्रॉसने केलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. जनसंपर्क अधिकारी सौ. उज्वला वर्मा यांनी मुलींना मासिक पाळीबाबत स्वच्छता, समज-गैरसमज बाबत मार्गदर्शन करीत सॅनिटरी नॅपकिन्स वापरण्याचा सल्ला दिला. रेडक्रॉसच्या चेअरमन डॉ. मंगला ठोंबरे यांनी सर्व विद्यार्थिनींना आपले राहणीमान, विचारसरणी आणि दिनचर्या याबाबत मार्गदर्शन करत सोशल मिडियाच्या आहारी न जाता अभ्यास करण्याचा सल्ला दिला. या प्रसंगी रेडक्रॉसचे सेक्रेटरी श्री.सुभाष सांखला,रक्तकेंद्राचे व्हाईस चेअरमन श्री.राजकुमार वाणी, सह प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेश सुरळकर व रेडक्रॉस  कर्मचारी आणि धनाजी नाना महाविद्यालयाचे प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.