शारीरिक दिव्यांगतापेक्षा सामाजिक दिव्यांगत्व कमी झाल्यास खऱ्या अर्थाने दिव्यांगांना समान संधी मिळेल – रेडक्रॉस आयोजित कार्यक्रमात “व्हीलचेअर गर्ल” दीक्षा दिंडे यांचे मनोगत

दिव्यांग व्यक्ती आपल्या समाजाचा एक अभिन्न भाग असून दिव्यांगता हे असमर्थता किंवा दुर्बलतेचे लक्षण नाही, तर ते एक अद्वितीय सामर्थ्य आहे. त्यांना समजून घ्या अशा भावना रेडक्रॉस आयोजित हृद्य संवाद कार्यक्रमात दिव्यांग व्यक्तींच्या हक्कांच्या खंद्या समर्थक श्रीमती. दिक्षा दिंडे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सुनीलकुमार लवटे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना रक्तकेंद्र चेअरमन डॉ.प्रसन्न कुमार रेदासनी यांनी श्रीमती दीक्षा दिंडे यांच्या सेवाकार्याचे कौतुक करत समाजाने दिव्यांगांच्या अडचणींसाठी सजग राहण्याचे आवाहन केले. हृद्य संवाद साधताना श्रीमती दीक्षा दिंडे यांनी सांगितले कि, प्रत्येक माणसाने संवादात्मक राहावे, जेणेकरून एकमेकांना समजून घेणे सहज सोपे होते. समाजातील शारीरिक, मानसिक दुर्बलतेपेक्षा सामाजिक दुर्बलता कमी झाली तरच खऱ्या अर्थाने दिव्यांगांना समान संधी मिळेल. दिव्यांगांना त्यांच्यातील कमतरतेची जाणीव न करून देता त्यांच्यासाठी आवश्यक सोयी सुविधा कशा उपलब्ध करून देता येतील आणि त्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी कसे प्रयत्न करता येईल यासाठी सर्वांनी योगदान दिले पाहिजे असे सांगितले. त्यांनी त्यांच्या आयुष्यात आलेल्या अडचणींवर कशा पद्धतीने मत केली, याबाबतचे अनुभव सांगत सर्वांशी संवाद साधला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी दीक्षा दिंडे यांच्या कार्याचे कौतुक करीत दिव्यांगां संबंधीच्या पाश्चात्य देशांमधील काही चांगल्या गोष्टी आपल्या देशात आणून दिव्यांगांना अधिक सक्षम करण्यासाठी त्यावर अंमल बजावणी करावी असे आवाहन केले.
यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. सुनीलकुमार लवटे आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीमती दीक्षा दिंडे आणि त्यांचे पती श्री. अमोल सुतार यांचा सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. रेडक्रॉस चेअरमन डॉ.मंगला ठोंबरे यांनी कार्यक्रम आयोजनासाठी सहकार्य केलेल्या सर्वांचे, रक्तदान केलेल्या रोबिनहूड आर्मी व नीर फाउंडेशनच्या सदस्यांचे व उपस्थितांचे आभार मानले. या प्रसंगी उपाध्यक्ष श्री. गनी मेमन, व्हाईस चेअरमन श्री. धनंजय जकातदार, सेक्रेटरी श्री. सुभाष सांखला, रक्तकेंद्र चेअरमन डॉ.प्रसन्नकुमार रेदासनी, व्हाईस रक्तकेंद्र चेअरमन श्री. राजकुमार वाणी, कार्यकारिणी सदस्य सौ.पुष्पा भंडारी, सौ.शमा सराफ, सौ. हर्षाली चौधरी, श्री.हर्षद दोशी, श्री. सागर पगारिया, श्री. मुकुंद गोसावी, श्री. मनोज गोविंदवार, महाविद्यालयीन विद्यार्थी व शहरातील मान्यवर उपस्थित होते.