मानसिक ताणतणावावर वेळीच उपचार घेतल्यास आयुष्य छान जगता येऊ शकते- रेडक्रॉसमार्फत प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ व पिसफुल माइंड क्लिनिकच्या संचालिका डॉ. यशश्री विसपुते यांचे मनोगत

इंडियन रेडक्रॉस सोसायटी जिल्हा शाखा जळगावच्या वतीने “मन मनास उमगत नाही” या महत्वपूर्ण विषयावर मनोचिकित्सक व सल्लागार मानसोपचार तज्ज्ञ, तसेच पिसफुल माईंड क्लिनिकच्या संचालिका डॉ. यशश्री विसपुते यांच्या व्याख्यानाचे आयोजन रेडक्रॉस भवन येथे करण्यात आले.
या प्रसंगी रेडक्रॉस चेअरमन डॉ. मंगला ठोंबरे यांनी डॉ. यशश्री विसपुते यांचा परिचय करून देत त्यांची भारतातील आणि परदेशातील सेवेची माहिती दिली आणि आजकालच्या दैनंदिन जीवनात अशा व्याख्यानाचे महत्व विशद केले.
डॉ. यशश्री विसपुते यांनी आपल्या व्याख्यानात सांगितले की, मानसिक आजाराला वयोमर्यादा नसून आपल्या दैनंदिन आयुष्यातील अनेक सवयी या मानसिक आजाराचे लक्षण असू शकतात. धावपळीचे जीवनमान, नात्यांमधील सुसंवादाचा अभाव, मोबाईलचा अतिवापर या कारणांमुळे अनेक व्यक्ती शारीरिक आजारांसोबत मानसिक व्याधींनीही ग्रसित होत आहेत. परंतु आपण समाजाच्या भीतीने मानसोपचार तज्ज्ञाकडे जाणे टाळतो. याचे दुष्परिणाम स्वतः सोबत कुटुंबाला देखील भोगावे लागू शकतात. वेळीच आपली, आपल्या कुटुंबातील सदस्यांची, किंवा मित्रांची मानसिक स्थिती समजून घेत मनात कोणताच दुराग्रह न बाळगता इतर आजारांप्रमाणेच वेळीच मानसोपचार तज्ज्ञाचा सल्ला अवश्य घ्या असे आवाहन त्यांनी केले. तसेच, त्यांच्या अनुभवातील अनेक उदाहरणे देऊन त्यांनी नागरिकांना मन स्वास्थ्याचे महत्व पटवून दिले आणि उपस्थित नागरिकांच्या शंकांचे निरसनही केले.
उपस्थितांचे आभार व्यक्त करताना रेडक्रॉस रक्तकेंद्राचे चेअरमन यांनी त्यांच्या वैद्यकीय प्रवासातील अनेक उदाहरणे देऊन मानसोपचाराचे महत्व सांगत उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्र संचलन जनसंपर्क अधिकारी सौ. उज्वला वर्मा यांनी केले. याप्रसंगी कार्यकारिणी सदस्य डॉ. शशिकांत गाजरे, डॉ. उषा शर्मा, प्रशासकीय अधिकारी लक्ष्मण तिवारी, सह प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेश सुरळकर, रेडक्रॉसचे कर्मचारी व जळगावकर नागरिक उपस्थित होते.