रेडक्रॉस जळगाव शाखेने जनतेसाठी धर्मार्थ दवाखाने जळगाव शहरात सुरु केलेले आहेत. जळगावातील वाघनगर मध्ये, कै.प्रा. शालीग्राम नवलराम पाटील आणि सौ. जिजाबाई शालिग्राम पाटील यांनी दान केलेल्या इमारतीत रेडक्रॉस संचलित पाटील धर्मार्थ दवाखाना, रेडक्रॉस जळगाव आणि सेवारथ परिवार यांच्या सहकार्याने डॉ. रितेश पाटील यांच्या देखरेखीत पिंप्राळा परिसरात रेडक्रॉस सेवार्थ दवाखाना सुरु करण्यात आला आहे. शहरातील बरेच दवाखाने दुपारच्या वेळी बंद असतात, तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा तपासणी विभाग दुपारी बंद असतो त्यामुळे रुग्णांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो याचा विचार करून रेडक्रॉस भवन येथे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सुरळकर यांच्या देखरेखीत जनरल तपासणी विभाग सुरु करण्यात आला आहे.येथेसर्व प्रकारच्या आजारांवर उपचार केले जात आहेत. गंभीर आजाराच्या रुग्णांना पुढील उपचारार्थ विविध शासकीय आरोग्य योजनांचा लाभ मिळण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात येते. या दवाखान्यांमध्ये अत्यल्प सेवाशुल्कात सेवा-सुविधा उपलब्ध असल्याने अनेक रुग्ण या सेवेचा लाभ घेत आहेत. या दवाखान्यामार्फत वेळोवेळी आरोग्य शिबिरांचे आयोजनही केले जाते.
