भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेनुसार भारत सरकारच्या “स्वस्थ नारी-सशक्त परिवार” या अभियानांतर्गत जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा रेडक्रॉस अध्यक्ष मा. श्री आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार दिनांक १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ दरम्यान इंडियन रेडक्रॉस सोसायटी जिल्हा शाखा विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यात प्रामुख्याने जिल्ह्याभरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आणि रक्तदात्यांना रक्तकेंद्रात येऊन स्वेच्छा रक्तदान करण्याबाबतही आवाहन करण्यात आले. या अनुषंगाने जळगाव शहर, एरंडोल, यावल, नांद्रा, पाचोरा इत्यादी ठिकाणी स्वेच्छा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यात एकूण ४७८ रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. तसेच, स्वेच्छा रक्तदानासाठी केलेल्या आवाहनानुसार ७१ रक्तदात्यांनी रेडकॉस रक्तकेंद्रात येऊन स्वेच्छा रक्तदान केले. या अभियानाअंतर्गत महिला व किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी दरम्यान घ्यावयाची काळजी, कॅन्सर जनजागृती, संतुलित आहार, ॲनिमिया जनजागृती इत्यादी बाबत माहितीपर सत्र आणि तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले. यात शहरातील विविध विद्यालय आणि महाविद्यालयांतील सुमारे १३०० विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच १८१ महिला व मुलींची ॲनिमिया (हिमोग्लोबिन), शुगर व बी.पी. तपासणी करण्यात आली. या अभियानांतर्गत जळगाव शहरात रेडक्रॉसमार्फत सुरू असलेल्या सर्व धर्मार्थ दवाखान्यांमध्ये महिलांसाठीचे विनामूल्य तपासणी अभियान राबविण्यात आले. यात एकूण १४९ महिलांची तपासणी करत त्यांना हिमोग्लोबिन वाढीसाठी मार्गदर्शन देखील करण्यात आले. या अभियानाचा दिव्यांग नागरिकांना फायदा व्हावा या उद्देशाने जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राअंतर्गत दिव्यांग मुलांचे आरोग्यसेवा शिबिर व कायदेविषयक जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. यात जळगाव जिल्ह्यातील कायदेतज्ज्ञांनी अनेक दिव्यांगांना त्यांच्या विविध कायद्याबाबत मार्गदर्शन केले. या अभियानाचाच एक भाग म्हणून जळगाव जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीतील कर्मचाऱ्यांना प्रथमोपचार प्रशिक्षण शिबीर देण्यात आले. या उपक्रमाचा समारोप इंडियन रेडक्रॉस सोसायटी जळगावच्या रक्तकेंद्रात अद्ययावत तंत्रज्ञानाने परिपूर्ण असलेल्या ट्रिमा कंपनीच्या एस.डी.पी. मशीनचे लोकार्पण करून करण्यात आला. या प्रसंगी जिल्हाधिकारी तथा रेडक्रॉस अध्यक्ष मा. श्री आयुष प्रसाद, रेडक्रॉस पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
