इंडियन रेडक्रॉस सोसायटी जिल्हा शाखा जळगाव मार्फत सुरु करण्यात आलेल्या रेडक्रॉस मानसशास्त्रीय समुपदेशन केंद्राचे व रेडक्रॉस समुपदेशन मार्गदर्शन पेटीचे उद्घाटन आज रेडक्रॉस भवन येथे करण्यात आले. आयुष्यातील अनपेक्षित घटनांमुळे, चिंता, भीती, नुकसान झाल्यामुळे एकटेपणा जाणवत असल्याने नैराश्य आलेल्या नागरिकांना खचून न जाता नव्याने आनंदी व उत्साही जीवन जगण्यासाठी मानसशास्त्रीय समुपदेशन करण्याच्या दृष्टीकोनातून मर्यादित काळासाठी हा उपक्रम सुरुवात करण्यात आला आहे. ज्या नागरिकांना समुपदेशनाची गरज वाटत असेल त्यांनी रेडक्रॉस भवन, सिव्हिल हॉस्पिटल रोड येथे पूर्व नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच तुम्हाला समस्या मांडण्याची भीती वाटत असेल अशा व्यक्तींनी शहरात १) रेडक्रॉस भवन, सिव्हिल हॉस्पिटल रोड, २)नवीन बस स्थानक,३) गोलाणी मार्केट, ४) भाऊंचे उद्यान या ठिकाणी लावण्यात आलेल्या “समुपदेशन मार्गदर्शन पेटीत” त्यांच्या समस्या लिखित स्वरुपात स्वतःचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांकसह टाकाव्यात. त्या समस्यांची दखल घेऊन संबंधित व्यक्तीस संपर्क करून बोलविण्यात येईल. तसेच, समुपदेशनासाठी आलेल्या व्यक्तींच्या ओळखीबाबत गुप्तताही पाळण्यात येणार आहे. नागरिकांच्या प्रतिसादानुसार या उपक्रमाची व्याप्तीही वाढविण्यात येणार आहे. याप्रसंगी रेडक्रॉस चेअरमन डॉ. मंगला ठोंबरे, व्हाईस चेअरमन व समुपदेशन समिती अध्यक्ष श्री.धनंजय जकातदार, रक्तकेंद्र चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, कार्यकारिणी सदस्य श्री. नीळकंठ गायकवाड, समुपदेशक व सभासद श्री. रागिब अहमद, ॲन्युअल असोसिएट्स डॉ. दत्ताराव राठोड, प्रशासकीय अधिकारी श्री. लक्ष्मण तिवारी, सिनियर लेखापाल श्री. महेश सोनगिरे उपस्थित होते. समुपदेशन पूर्व नाव नोंदणी करण्यासाठी 7378343834 आणि 9422436566 या संपर्क क्रमांकांवर संपर्क करावा असे रेडक्रॉस समुपदेशन समितीच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
