जळगाव – आजच्या झपाट्याने बदलणा-या जगात सर्व सुखसोई सहज उपलब्ध होत असतांनाही अजूनही काही आदिवासी पाडे-वस्ती अगदीच लहान सुखांपासूनही वंचित आहेत. काबाडकष्ट- मोलमजूरी करून आपला उदरनिर्वाह करणे हेच त्यांचे जीवन ! त्यामुळे दिवाळीच्या सणासुदीला गोड पदार्थ मिळणे दुरापास्तच. याच परिस्थितीचा भावनात्मक विचार करून इंडियन रेडक्रॉस सोसायटी जळगाव शाखेने यावल तालूक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले धुळेपाडा (३५ परिवार) व डोंगरदे (२०० परिवार) यांच्यासोबत जाऊन दिवाळी साजरी केली. यावेळी रेडक्रॉसकडे उपलब्ध असलेल्या बकेट, साड्या, ताडपत्री, कपडे आणि दानदात्यांच्या उदात्त सहकार्याने प्राप्त झालेल्या तांदूळ, डाळ, मीठ, लोणचे, मिर्ची, कपडे, वह्या, मिठाई, नमकीन, इत्यादी जीवनावश्यक वस्तूंचे किट बनवून लहान निरागस बालक-भगिनी-वयोवृद्ध आदिवासी बांधवांना वितरीत करून आगळी -वेगळी दिवाळी साजरी केली. रेडक्रॉसचे उपाध्यक्ष गनी मेमन, सेक्रेटरी सुभाष सांखला यांच्या आवाहनास प्रतिसाद देत दानशूर बांधव, संस्थेचे पदाधिकारी पुष्पाताई भंडारी, डॉ. उषा शर्मा यांनी मदतीचा हात पुढे केला. रेडक्रॉसच्या चेअरमन डाँ. मंगला ठोंबरे, रक्तकेंद्र चेअरमन डाँ.प्रसन्नकुमार रेदासनी, रक्तकेंद्र व्हाईस चेअरमन राजकुमार वाणी, ॲन्यूअल असोसिएट सॅम शेफर्ड, प्रा.डाँ. दत्तराव राठोड, यावल येथील ॲन्यूअल असोसिएट गोपाल महाजन, मनिष चौधरी, राजेश श्रावगी आणि या आदिवासी भागाची माहिती असलेले प्रा. डाँ. वडींगर सर यांनी प्रत्यक्षात पाड्यावर पोहोचून सदर सर्व साहित्य दिवाळी भेट म्हणून वितरीत केले. अतिशय शिस्तीत प्रत्येक आदिवासी परिवाराने कोणतीही घाई-गडबड व गोंधळ न करता रेडक्रॉसकडून दिवाळी भेट स्वीकारली. या प्रसंगी त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान व आनंद लक्षात घेता खऱ्या अर्थाने दिवाळी सण साजरा केल्याच्या भावना मान्यवरांनी व्यक्त केल्या. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी रेडक्रॉसचे पदाधिकारी, ॲन्यूअल असोसिएट आणि रेडक्रॉसचे कर्मचारी समाधान वाघ, शितल शिंपी, योगेश सपकाळे, मनोज वाणी, उज्वला वर्मा, अन्वर खान, आमिर शाह यांनी परिश्रम घेतले.
