इंडिअन रेडक्रॉस सोसायटी जळगाव शाखेच्या ‘रक्तकेंद्र’ या जीवनदायी उपक्रमाची सेवा मागील ४५ वर्षांपासून अव्याहतपणे सुरु असून जळगाव जिल्हा व आसपासच्या जिल्ह्यातील रुग्णांची अखंडितपणे रुग्णसेवा करण्याचे कार्य अविरतपणे सुरु आहे. रक्तकेंद्रामार्फत नियमितपणे शासकीय व निमशासकीय कार्यालये, सेवाभावी संस्था, औद्योगिक कंपन्या, शैक्षणिक संस्था, महाविद्यालये, विविध मंडळे आणि सेवाभावी स्वेच्छा रक्तदान शिबिरांचे आयोजक यांच्या सहकार्याने विविध ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित केली जातात व यातून रक्तकेंद्रात मुबलक रक्तसाठा उपलब्ध होत असतो.
इंडियन रेडक्रॉस सोसायटी संस्थेचा प्रमुख उपक्रम रक्तकेंद्राकडून गरजू रुग्णांना आवश्यकतेनुसार रक्त पुरवठा करणे हा असून, जळगाव शाखेच्या रक्तकेंद्रामार्फत रक्त पुरवठ्यामार्फत अहोरात्र अखंडितपणे रुग्णसेवा करण्याचे कार्य सुरु आहे. जळगाव शाखेचे रक्तकेंद्र अद्ययावत व सुधारित तंत्रज्ञानाने सुसज्ज असून उत्तर महाराष्ट्रात ‘नॅट’ प्रणालीयुक्त रक्त पुरवठा या केंद्राकडून केला जात असल्याने हे रक्तकेंद्र रुग्णांच्या विश्वासाला पात्र ठरत आहे. प्रत्येक वर्षात हजारो रक्त व रक्तघटकांची उलाढाल या रक्तकेंद्राकडून होत असते. या केंद्राकडून डेंग्यू, विषारी मलेरिया बाधित रुग्णांना एस.डी.पी आणि आर.डी.पी. प्लेटलेट्स घटकांचा पुरवठा करून अनेक रुग्णांना जीवनदान देण्यात आले आहे. तसेच, थॅंलेसेमिया रुग्णांना पी.सी.व्ही. रक्तघटक विनामूल्य देऊन आत्तापर्यंतच्या थॅंलेसेमिया रुग्णांना रक्तपुरवठा वितरणाचा उच्चांक या शाखेने गाठला आहे. जिल्ह्याभरातील ७० ते ८० % थॅंलेसेमिया ग्रस्त रुग्णांना रक्तपुरवठा हा या रक्तकेंद्रामार्फत होतो असतो. तसेच, या थॅंलेसेमिया रुग्णांना नॅट प्रमाणित रक्ताचा विनामूल्य पुरवठा व्हावा म्हणून शाखेकडून “थॅलेसेमिया अमृत योजना” सुरू करण्यात आली असून या योजनेस समाजातील दानशूर व्यक्तींचे योगदान मिळत आहे. या योजनेत थॅलेसेमिया ग्रस्त बालकाला एका वर्षासाठी, कोणतीही व्यक्ती, रकम रुपये ११,०००/- वार्षिक देणगी देऊन त्या रुग्ण बालकास नॅट प्रमाणित रक्त देऊ शकते जेणेकरून या रुग्णांचे जीवनमान उंचावेल. या योजनेअंतर्गत आतापर्यंत जवळजवळ ३००-३२५ थॅलेसेमिया ग्रस्त बालकांना दानशूर व्यक्तींनी दत्तक घेतलेले असून या बालकांना नॅट प्रमाणित रक्तपिशवी विनामूल्य देण्यात येत आहे. यात रोटरी क्लब जळगाव आणि रोटरी क्लब जळगाव मिडटाऊन यांचे मोलाचे योगदान आहे. रक्तकेंद्रामार्फत नियमितपणे सेवाभावी संस्था, शैक्षणिक संस्था,विविध मंडळे, शिबिर आयोजक यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिरे आयोजित केली जातात. सोशल मिडिया आणि एस.एम.एस.च्या माध्यमातून रक्तदानाच्या प्रचार व प्रसाराकरिता सर्व पदाधिकारी व कर्मचारी सतत प्रयत्नशील असतात. रक्त संकलनाकरिता संस्थेचे वातानुकूलीत वाहने असल्याने त्या माध्यमातून “रक्तकेंद्र आपल्या दारी” या उपक्रमांतर्गत रक्तसंकलन केले जाते. यामुळे संपूर्ण जिल्ह्याभरात रक्तसंकलन करणे सुलभ झाले आहे.
रक्तदात्यांच्या परिवाराचे आर्थिक संरक्षण म्हणून एक सामाजिक भावनेतून “रक्तदाता अपघात विमा योजना” सुरु असून त्यात किमान रकम रुपये ५०,०००/- ते रु.२,००,०००/- रकमेचे अपघाती विमा सरंक्षण करण्यात येते, या योजनेअंतर्गत आतापर्यंत अपघातात मृत पावलेल्या १७ रक्तदात्यांच्या वारसांना एकूण १० लाख पन्नास हजार रुपये विमा रक्कम विमा कंपनीकडून मिळवून देण्यात आलेली आहे.
गरीब गरजू रुग्णांना विनामूल्य रक्तपुरवठ्याकरीता “जीवनदान योजना” सुरु असूनया योजेनेत रकम रुपये २१०००/- वत्यापटीत दानशूर दात्यांकडून देणगी रक्कम स्वीकारली जाते. या योजने अंतर्गत दरवर्षी कायमस्वरूपी एक रक्तपिशवी गरीब गरजू रुग्णांना विनामूल्य देण्यात येते. तसेच “भावस्पर्श योजनेत” रकम रुपये २१००/- देणगी स्वीकारली जाते. त्यातून वर्षातून एकदाच एक रक्तपिशवी गरीब गरजू रुग्णास विनामूल्य देण्यात येते. अर्थात या देणगीस आयकरात ८० जी कलमानुसार सूट मिळते. आपणही या योजनेत सहभाग घेऊन हातभार लावावा जेणेकरून गरीब व गरजू रुग्णांना विनामूल्य रक्तपुरवठा करणे सहज शक्य होईल असे आवाहन करण्यात येत आहे.
शालेय स्तरावर विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून अनेक उपक्रम राबवले जातात. या अंतर्गत आता प्रत्येक विद्यार्थ्याचा रक्तगट हा विद्यालयाच्या दप्तरी नोंद केलेला असणे आवश्यक केलेले आहे. जळगाव रेडक्रॉस रक्तकेंद्रामार्फत शाळांमधील विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी शिबिरे आयोजित करण्यात येत असतात.
सामान्यतः महिलांमध्ये रक्तदान करण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे तीव्र इच्छा असूनही अनेक महिलांना रक्तदान करता येत नाही. महिलांनी रक्तदानाच्या क्षेत्रात पुढे यावे आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी या उद्देश्याने रेडक्रॉस रक्तकेंद्राकडून महिलांची हिमोग्लोबिन तपासणी केली जाते. तसेच, हिमोग्लोबिन वाढीसाठी तज्ज्ञ डॉक्टरांकडून नियमित मार्गदर्शन केले जाते व गरजेनुसार पूरक औषधींचे वितरण देखील करण्यात येते.
रक्तकेंद्राकडून प्रत्येक रक्त दात्यांची पुढील प्रकारे काळजी घेतली जाते ती म्हणजे –
● प्रत्येक रक्तदात्याचा गौरव पत्र देऊन सन्मान ● प्रत्येक रक्तदात्याला रु. ५०,००० चे अपघाती विमा संरक्षण ● पुरुष रक्तदाता प्राधान्य कार्डवर रू. ३०० सेवाशुल्क सवलत ● महिला रक्तदाता प्राधान्य कार्डवर रु. ४०० सेवाशुल्क सवलत ● प्रत्येक विद्यार्थी रक्तदात्याला कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अध्यादेशानुसार दोन अतिरिक्त गुण ● स्वतःसाठी रक्तपिशवी लागत असल्यास स्वतःच्या रक्तदाता प्राधान्य कार्डवर प्रत्येकी एक रक्तपिशवी विनामूल्य उपलब्ध.
