राष्ट्रीय युवा दिनानिमित्त रेडक्रॉसतून पुढाकाराने आणि एस. के. ऑइल इंडस्ट्रीज यांच्या आर्थिक योगदानातून धनाजी नाना समाजकार्य महाविद्यालयाला सॅनिटरी वेडिंग आणि डिस्पोजल मशीन भेट.

राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून इंडियन रेडक्रॉस सोसायटी जळगाव यांच्या पुढाकारातून आणि एस. के. ऑइल इंडस्ट्रीज यांच्या आर्थिक योगदानातून धनाजी नाना समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थिनींकरिता सॅनिटरी वेडिंग आणि डिस्पोजल मशीन सुपूर्त करण्याचा कार्यक्रम महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये आज दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.

      कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना रेडक्रॉसच्या जनसंपर्क अधिकारी सौ. उज्वला वर्मा यांनी विद्यार्थिनींच्या आरोग्यासाठी एस. के. ऑईल मिल इंडस्ट्रीजने दाखविलेल्या दातृव भावनेसाठी आभार व्यक्त करीत विद्यार्थिनींनी या सुविधेचा उपयोग करावा असे आवाहन केले. रेडक्रॉसच्या चेअरमन डॉ. मंगला ठोंबरे यांनी प्रत्येक विद्यार्थ्याने स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या चारित्र्याचे वाचन करून त्यांची शिकवण अंगीकारावी व सक्षम समाज घडविण्यासाठी योगदान द्यावे असे मनोगत व्यक्त केले. धनाजी नाना चौधरी विद्याप्रबोधिनी संस्थेचे उपाध्यक्ष आणि रेडक्रॉस कार्यकारिणी सदस्य श्री. सुनील पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, भारत हा युवकांचा देश असून परिवर्तन घडविण्याची टाकद युवकांमध्ये आहे,  तरी युवापिढीने स्वामी विवेकानंदांचा आदर्श डोळ्यापुढे ठेऊन वाटचाल करावी.  महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. राकेश चौधरी यांनी रेडक्रॉसच्या सेवेचे कौतुक करीत वेळोवेळी रेडक्रॉस करत असलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. प्राध्यापिका सौ. सुनिता चौधरी यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले. याप्रसंगी रेडक्रॉसचे सेक्रेटरी श्री. सुभाष सांखला, प्राध्यापक डॉ. उमेश वाणी. श्री. वाय.जी.महाजन, सौ. भारती गायकवाड सौ. कल्पना भारंबे, सर्व प्राथ्यापक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.