रक्तदानासंदर्भात माहिती :
रक्त हे कृत्रिमरीत्या तयार करता येत नाही.
कोणतीही निरोगी प्रौढ (१८ वर्षपिक्षा जास्त व ६५ वर्षापर्यंत वय असलेली ) व्यक्ती रक्तदान करू शकते. त्याचे वजन ४५ किलोपेक्षा जास्त असावे.
निरोगी व्यक्ती पहिल्या रक्तदानानंतर ९० दिवसांनी पुन्हा रक्तदान करू शकते. वर्षातून ४ वेळा रक्तदान करणे सुरक्षित मानले जाते.
रक्तदान केल्याचे अनेक फायदे आहेत. रक्तदानामुळे रक्तदात्याचे रक्ताभिसरण सुधारते, त्याचे ट्रायग्लिसराइड्स कमी होतात आणि त्याला हृदयविकार होण्याची शक्यता कमी होते.
याशिवाय रक्तदानाचे अनेक फायदे आहेत, ते खालीलप्रमाणे:-
- रक्ताची तपासणी होते (एच आय व्ही., गुप्त रोग, कावीळ-ब. क प्रकारची, मलेरिया) वजन, तापमान, रक्तदाब व नाडी परीक्षण होते.
- रक्तगट व हिमोग्लोबिनच्या प्रमाणाबाबत माहिती मिळते.
- बोन मॅरोमध्ये नवीन रक्त तयार करण्याची कार्यक्षमता वाढते.
- नवीन तयार झालेल्या रक्तपेशी व रक्तरस यामुळे रोग प्रतिकार शक्ती वाढून शरीरात चैतन्य निर्माण होते.
- नियमित रक्तदान केल्याने शरीरातील लोहाचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा जास्त वाढत नाही. त्यामुळे हृदय यकृतासारखे अवयव निरोगी राहतात.
- रक्तदान करण्यासाठी रक्तदात्याची माहिती घेतली जाते. त्यानंतर रक्त काढण्यासाठी एक निर्जंतुक सुई वापरली जाते.
रक्तदान करण्यापूर्वी पुरेसा आराम करणे, पाणी पिणे आणि संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. त्यानंतरही आराम करणे आणि योग्य आहार घेणे महत्त्वाचे आहे.
तुमच्यासाठी रक्तदान करणे ही एक सोपी गोष्ट आहे, परंतु तुमचे रक्तदान हे इतरांच्या जीवनात खूप मोठी भूमिका बजावू शकते.
रक्तदान हे संपूर्णपणे सुरक्षित, वेदनारहित व आनंददायी आहे.
रक्तदानाच्या संपूर्ण प्रक्रियेला सुमारे अर्धा तास लागतो. रक्तदानासाठी सरासरी फक्त ८ ते १० मिनिटे लागतात.
प्रत्यक्ष रक्तदानाला सुरुवात करण्यापूर्वी रक्तदात्याची नोंदणी पूर्ण करावी लागते, ज्यामध्ये रक्तदात्याचे नाव, पत्ता, फोन नंबर आणि त्याचा ओळख क्रमांक (जर त्याच्याकडे असेल तर) यासारखी माहिती समाविष्ट असते.
रक्तदात्याच्या आरोग्य इतिहासाबद्दल काही प्रश्नांची उत्तरे विचारली जातात.
रक्तदात्याच्या शरीराचे तापमान, हिमोग्लोबिन, रक्तदाब आणि नाडी तपासली जाते.
जेव्हा अंदाजे एक पिंट रक्त गोळा केले जाते, तेव्हा रक्तदान पूर्ण होते आणि एक कर्मचारी रक्त दात्याच्या हातावर सुई काढून टाकल्यावर चिकट पट्टी लावतो.
रक्तदात्याच्या शरीरातील द्रवपदार्थाच्या प्रमाणात किंचित घट झाल्यामुळे शरीराशी जुळवून घेण्यासाठी वेळ मिळावा म्हणून रक्तदात्याला काही मिनिटे थोडा अल्पोपहार दिला जातो.
रक्तदान झाल्यावर १०-१५ मिनिटांनंतर रक्तदाता रक्त देण्याचे ठिकाण सोडू शकतो आणि त्याचे सामान्य दैनंदिन काम सुरू ठेवू शकतो.
कुणाचा तरी जीव वाचवण्यास आपण मदत केली आहे हे जाणून रक्तदाता स्वतः समाधानाची भावना अनुभवू शकतो.
रक्तदात्याच्या रक्तदानामुळे जास्तीत जास्त चार जणांना मदत होऊ शकते. दान केलेल्या लाल रक्तपेशी कायम टिकत नाहीत, त्यांचा कालावधी ४२ दिवसांपर्यंत असतो.
रक्तदान केल्यानंतर रक्तदात्याने अल्कोहोल नसलेले द्रवपदार्थ अतिरिक्त चार ग्लास (प्रत्येकी आठ औंस) प्यावेत.
रक्तदानानंतर पुढील पाच तास हातावरील चिकटपट्टी राहू द्यावी आणि ती कोरडी ठेवावी व जास्त व्यायाम करू नये किंवा सामान उचलू नये.
जर सुईच्या जागेवरून रक्त येऊ लागले, तर रक्तदात्याने हात सरळ वर करावा आणि रक्तस्त्राव थांबेपर्यंत त्या जागेवर दाबून ठेवावे.
रक्तदात्याने रक्तदानानंतर निरोगी जेवण खावे आणि नियमित आहारात लोहयुक्त पदार्थांचा समावेश करण्याचा विचार करावा, किंवा रक्तदानाने गमावलेले लोह भरून काढण्यासाठी आरोग्य सेवा प्रदात्याशी लोह पूरक आहार घेण्याबद्दल त्याने चर्चा करावी.
जर रक्तदानानंतर चक्कर येत असेल किंवा डोके हलके होत असेल तर तो जे काम करीत असेल ते थांबवावे, झोपावे आणि पाय वर उंचावर ठेवावेत. जोपर्यंत चक्कर येत असल्याची किंवा डोके हलके होत असल्याची भावना निघून जात नाही आणि सुरक्षितपणे क्रियाकलाप पुन्हा सुरू करण्यासाठी पुरेसे बरे वाटत नाही तो पर्यंत त्याच स्थितीत राहावे. रक्त संक्रमण अधिकारीने त्याला ग्लुकॉन-डी चे द्रावण प्यायला द्यावे.
रक्तदाताच्या हाताच्या मांसल भागात रक्त काढण्यासाठी सुई घातल्यावर फक्त एका क्षणासाठी त्याला चिमटी घेतल्यासारखे जाणवेल.
रक्तदात्याच्या रक्तदानातून मिळालेला प्लाझ्मा सुमारे २४ तासांच्या आत बदलला जातो. लाल रक्तपेशी पूर्णपणे बदलण्यासाठी सुमारे चार ते सहा आठवडे लागतात. म्हणूनच संपूर्ण रक्तदानांमध्ये किमान बारा आठवडे अंतर असणे आवश्यक आहे.
निरोगी शरीरात रक्त तयार होत राहिल्यामुळे, नवीन लाल रक्तपेशी सुमारे चार ते सहा आठवड्यांत दान केलेल्या रक्तपेशींची जागा घेतात.
रक्तदान करण्यासाठी तुमचे किमान वयं १८ वर्षे असणे आवश्यक आहे. रक्तदानासाठी ६५ वर्षे वयाची उच्च वयोमर्यादा आहे.
जर एखाद्या व्यक्तिला मधुमेह असेल आणि इन्सुलिन किंवा तोडावाटे घेतलेली औषधे त्याला मधुमेह व्यवस्थापित करण्यास मदत करत असतील तर ती व्यक्ति रक्तदान करण्यास पात्र आहे, परंतु मधुमेह नियंत्रणात असला पाहिजे.
जर रक्तदान करू इच्छिणाऱ्या व्यक्तिने गांजा ओढला असेल तर तो चोवीस तासांनंतर रक्तदान करू शकतो.गांजाचा वापर त्याला रक्तदान करण्यास अपात्र ठरवणार नाही, तथापि, जर गांजाच्या वापरामुळे गोष्टी लक्षात ठेवणे किंवा समजणे कठीण होत असेल तर त्या व्यक्तिने रक्तदान केंद्रात जाऊ नये.
गर्भवती महिला रक्तदान करण्यास पात्र नाहीत. बाळंतपणानंतर त्या एक वर्षाने रक्तदान करू शकतात.
रक्त जीवनासाठी आवश्यक आहे त्यात असे घटक असतात जे व्यक्तिच्या शरीरात ऑक्सिजनची वाहतूक करतात आणि संसर्गाशी देखील लढतात.
मानवी रक्ताला कोणताही कृत्रिम पर्याय नाही – फक्त मानवी शरीरच रक्त बनवू शकते.
गंभीर वैद्यकीय परिस्थितीसाठी बरेच लोक जीवनरक्षक रक्तसंक्रमणावर अवलंबून असतात आरोग्यसेवा प्रदाते रक्तदाताच्या रक्ताचे चार स्वतंत्र घटक वापरू शकतात.
लाल रक्तपेशी : ऑनमिया असलेल्या लोकांवर किंवा दुखापती किंवा शस्त्रक्रियेमुळे खूप रक्त वायां गेलेल्या लोकांवर उपचार करण्यासाठी प्रदाते लाल रक्तपेशींचा वापर करतात.
प्लाझ्मा: दुर्मिळ आजार, गंभीर संसर्ग, भाजणे आणि यकृत निकामी झालेल्या लोकांना प्लाझ्मा देतात.
प्लेटलेट्स : कापले किंवा इतर जखमा झाल्यास प्लेटलेट्स रक्त गोठवतात. कर्करोगाच्या उपचारांमध्ये आणि अवयव प्रत्यारोपणातही प्रदाते प्लेटलेट्सचा वापर करतात.
रक्तपुरवठा आणि आपल्या रक्तदात्यांची सुरक्षितता ही रेडक्रॉसची सर्वोच्च प्राथमिकता आहे.
रुग्णांना तुमचे रक्त मिळणे सुरक्षित आहे याची खात्री करण्यासाठी आणि त्या दिवशी रक्तदान करणे तुमच्यासाठी सुरक्षित आहे याची खात्री करण्यासाठी रेडक्रॉसकडून रक्तदानापूर्वी काही प्रश्न रक्तदात्याला विचारले जातात.
प्लेटलेट ऍफेरेसीस दाते दर १५ दिवसांनी व वर्षातून २४ वेळा रक्तदान करू शकतात.
स्वतःसाठी रक्त देणाऱ्यांसाठी (ऑटोलॉगस रक्तदात्यांसाठी) नियम वेगळे आहेत.
प्लेटलेट दान:
ॲफेरेसिस् म्हणजे काय?
ॲफेरेसिस् ही अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे रक्तदात्याकडून प्लेटलेट्स आणि इतर विशिष्ट रक्त घटक (लाल पेशी किंवा प्लाझ्मा) गोळा केले जातात. “ॲफेरेसिस् हा शब्द ग्रीक शब्द फेरेसिसपासून आला आहे ज्याचा अर्थ “काढून टाकणे” असा होतो. ही प्रक्रिया पेशी विभाजक नावाच्या मशीनचा वापर करून पूर्ण केली जाते. रक्तदात्याकडून रक्त घेतले जाते आणि प्लेटलेट्स किंवा इतर रक्त घटक पेशी विभाजकाद्वारे गोळा केले जातात आणि रक्ताचे उर्वरित घटक रक्तदानादरम्यान रक्तदात्याकडे परत केले जातात. प्रत्येक ॲफेरेसिस् देण्याच्या प्रक्रियेला सुमारे दीड ते दोन तास लागतात.
प्लेटलेट्स म्हणजे काय आणि ते कसे वापरले जातात?
प्लेटलेट्स हे रक्तात फिरणारे लहान, रंगहीन, डिस्क आकाराचे कण असतात आणि ते सामान्य रक्त गोठण्यासाठी आवश्यक असतात. रक्त गोठण्याच्या समस्या (अप्लास्टिक ॲनिमिया, ल्युकेमिया) किंवा कर्करोग असलेल्या अनेक रुग्णांच्या आणि अवयव प्रत्यारोपण किंवा हृदय बायपास ग्राफ्ट्स सारख्या मोठ्या शस्त्रक्रिया करणाऱ्या रुग्णांच्या जगण्यासाठी प्लेटलेट्स अत्यंत महत्त्वाचे असतात. प्लेटलेट्स गोळा केल्यानंतर फक्त पाच दिवस साठवता येतात.
रक्तदात्याने आधीच्या ३ दिवसांत कोणतेही प्रतिजैविक औषध घेतलेले असल्यास किंवा रक्तदात्याला मागील ६ महिन्यात मलेरिया झाला असल्यास किंवा रक्तदात्याला मागील १ वर्षात विषमज्वर, कावीळ किंवा श्वानदंश होऊन त्याने रेबीजची लस घेतली असल्यास किंवा ६ महिन्यापूर्वी त्याची मोठी शस्त्रक्रिया झाली असल्यास किंवा रक्तदाता गर्भवती महिला असल्यास किंवा महिलेला १ वर्षाखालील मूल असल्यास किंवा तिचा ६ महिन्यात गर्भपात झाला असल्यास, अशा व्यक्ती रक्तदान करू शकत नाहीत.
ब्लड प्रेशर लो किंवा हाय असणाऱ्यांनी रक्तदान करताना रक्तदाबाची चाचणी करून पहावी.
उपाशीपोटी किंवा खाऊन झाल्यावर अर्धा तासापर्यंत रक्तदान करू नये.
कर्करोग, मधुमेह, हृदयरोग, कावीळ (ब, क प्रकारची), एड्स, मूत्रपिंड रोग, गुप्त रोग, यकृताच्या व्याधी असलेले रक्तदान करण्यास कायमचे अपात्र ठरतात.
स्वेच्छेने रक्तदान करणाऱ्या रक्तदात्याला प्रमाणपत्र व कार्ड दिले जाते. ह्या कार्डावर रक्तदात्यास किंवा त्याच्या परिवारापैकी कुणाला रक्ताची गरज असल्यास रक्तपेढीतर्फे एक युनिट रक्त मोफत दिले जाते.
समाजाचे ऋण फेडायची एक संधी रक्तदानामुळे मिळते.
रक्तदाते (स्वयंसेवक) स्वखुशीने अणि विनामोबदला रक्तदान करतात.
अपघातात झालेला अतिरिक्त रक्तस्राव, पॅलेसोमिया, रक्तक्षय, रक्ताचा कर्करोग, प्रसूतिपश्चात रक्तस्राव, आणि इतर गंभीर आजारामधे योग्यवेळी रुग्णाला रक्त मिळाले नाही तर तो रुग्ण दगावण्याची शक्यता असते. अशावेळी एका मानवाचेच रक्त दुसऱ्या मानवाचे प्राण वाचवू शकते कारण मानवाचे रक्त कोणत्याही कारखान्यात तयार होत नाही व दुसऱ्या कोणत्याही रक्तदानाच्या तुमच्या नियोजित दिवशी तुम्हाला सर्दी किंवा फ्लू झाला असेल, तर तुम्ही तुमची अपॉइंटमेंट रद्द करावी आणि बरे वाटल्यानंतर पुन्हा रक्तदानाचे वेळापत्रक निश्चित करावे. याव्यतिरिक्त इतर आरोग्यविषयक चिंता तुम्हाला रक्तदान करण्यापासून तात्पुरते रोखू शकतात, जसे की, काही औषधे, हिमोग्लोबिनची कमी पातळी (तुमच्या शरीरातील प्रथिने जी पेशीमध्ये ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्सिाइड वाहून नेतात, अशक्तपणा, उच्च किंवा कमी रक्तदाब किंवा हृदयाचा ठोका, मलेरियाचा धोका असलेल्या देशात अलिकडचा प्रवास, अलिकडेच झालेले रक्त संक्रमण.
इतर मागील आणि सध्याच्या आरोग्यविषयक समस्या तुम्हाला रक्तदान करण्यापासून कायमचे रोखतील अश्या रक्तदानाच्या अपात्रतेमध्ये, एचआयव्ही /एड्स, काही प्रकारचे हेपॅटायटीस, कर्करोग जसे की ल्युकेमिया, लिम्फोमा आणि इतर रक्त कर्करोग, यांचा समावेश होतो.
रक्तदानानंतर जर रक्तदात्यास ताप आणि स्नायू दुखणे यासारख्या इतर समस्या उद्भवल्या तर रक्तदात्याने रेडक्रॉसला कळवावे.
जर तुम्ही नियमित रक्तदाते असाल, तर तुमच्या आहारात मल्टीविटामिन समाविष्ट करण्याबद्दल तुमच्या आरोग्य सेवा प्रदात्याशी बोलावे. रक्तदान करताना तुमचे लोह आणि इतर जीवनसत्त्वेचे कमी होत नाहीत याची खात्री करावी.
रक्तदान केल्याबद्दल रक्तदात्याला पैसे मिळणार नाहीत.
तुम्ही दान केलेल्या रक्ताचा वापर अशा लोकांसाठी केला जाईल ज्यांना रक्ताची सर्वात जास्त गरज आहे.
तुमच्यासारख्याच रक्तगटाच्या कुटुंबातील सदस्यासाठी किंवा मित्राला रक्तदान करण्यासाठी तुम्ही रक्तदान करू शकता. याला निर्देशित रक्तदान म्हणतात.
कधीकधी, एक निरोगी व्यक्ती तातडीच्या शस्त्रक्रियेपूर्वी रक्तदान करू शकते. हे रक्त साठवले जातें आणि फक्त दान केलेल्या व्यक्तीसाठीच शस्त्रक्रियेसाठी उपलब्ध असते. हे विशेषतः अशा लोकांसाठी उपयुक्त आहे ज्यांना अँटीबॉडीजमुळे रक्त शोधण्यात अडचण येते. याला ऑटोलॉगस डोनेशन् म्हणतात.
प्राण्याचे रक्त मानवासाठी उपयोगात येऊ शकत नाही, त्यामुळे रक्तदानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
महाराष्ट्र राज्यात रुग्णांसाठी दरवर्षी सुमारे साडेसात लाख बाटल्या रक्त लागते. ही गरज ७० ते ७५ टक्के पर्यायी बदली रक्तदाता किंवा व्यावसायिक रक्तदात्याकडून भागविली जाते.
मानवाच्या शरीरामध्ये पाच ते सहा लिटर रक्त असते. रक्तदानाच्या वेळी केवळ ३५० मि.ली. किंवा ४५० मि.ली. रक्त घेतले जाते. प्रत्येक रक्तदानानंतर साधारण ३६ तासांमधे शरीरात रक्ताची पातळी पूर्ववत होते. तसेच साधारण २ ते ३ आठवड्यामधे रक्तपेशीही पूर्ववत होतात. रक्तदान केल्याने कोणताही त्रास किंवा इजा होत नाही.
ब्लड बँकेच्या रेफ्रिजरेटरमध्ये रक्त ४-५ आठवड्यांपर्यंत सुरक्षित ठेवता येते.
रक्त न मिळाल्यामुळे मृत्यूचे प्रमाण देशभरात १५ ते २० टक्के आहे.
भारतात केवळ ०.६ टक्के लोक रक्तदान करतात.
थोडक्यात रक्तदान कोणी, केव्हा व कुठे करावे?
- वयाच्या १८ वर्षानंतर (६५ वर्षापर्यंत),
- वजन ४५ कि.ग्रॅ.च्या वर असल्यास,
- रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमीत कमी १२.५ ग्रॅम असल्यास,
- रक्तदाता पूर्णपणे निरोगी असल्यास,
निरोगी माणसाला दर ३ महिन्यांनी जवळच्या रक्तपेढीत किंवा कोठेही आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात रक्तदान करता येते.
आपल्या जिव्हाळ्याच्या माणसांचे जीवन अधिक सुरक्षित करण्यासाठी नॅट सुरक्षित रक्त:
नॅट (NAT) म्हणजे (न्यूक्लिक ॲसिड टेस्ट)सर्वाधिक सुरक्षित रक्त पुरवठा करण्याकरिता जागतिक दर्जाचे प्रभावी तंत्रज्ञान आहे.
प्रत्येक रक्तदात्याने दिलेल्या रक्तावर ते रक्त साठवून ठेवण्यापूर्वी त्या रक्त वापरामुळे एच.आय.व्ही., हेपॅटायटीस बी, हेपॅटायटीस सी, मलेरिया, सिफिलीस इत्यादि घातक संसर्ग होऊ नयेत यांकरिता चाचण्या सामान्यत: एलायझा नावाच्या तंत्राने केल्या जातात. वरील पैकी कुठल्याही प्रकारचा विषाणू रक्तदात्याच्या शरीरात शिरला असेल तर त्या विषाणूचा प्रतिकार करण्यासाठी शरीरात प्रतिकारके (Antibodies) निर्माण होतात. या प्रतिकारकांचा शोध घेऊन या विषाणूंचे अस्तित्व ओळखण्याचे काम एलायझा या तंत्राद्वारे केले जाते.
रोश कंपनी नॅट चाचणी करिता पी.सी.आर. (Polimerise Chain Reaction) हे आधुनिक तंत्रज्ञान वापरले जाते. या तंत्रज्ञानामध्ये जनुकातील डी.एन.ए.(DNA) सेगमेंटचे विभाजन केले जाते व विभाजित केलेल्या सेगमेंटच्या करोडो कॉपीज बनविल्या जातात. यामुळे जंतूंचा प्रादुर्भाव झालेल्या सेगमेंटचेही डुप्लीकेशन होते व रोगाचे निदान लवकर केले जाते.
विंडो पिरीयड-म्हणजे मनुष्यास जंतु संसर्ग झाल्यापासून ते जंतु संसर्ग लक्षात येण्याचा कालावधी होय. हा जंतु संसर्ग लक्षात येण्याचा कालावधी कमी झाल्यामुळे रोग निदान लवकर होते व रक्तातून जंतु संसर्ग होण्याचा धोका टळतो. नॅट तंत्रज्ञानामुळे रक्त संक्रमणातून जंतूंच्या प्रादुर्भावाचा धोका खूप कमी झाला आहे.

नॅट तंत्रज्ञानाच्या सहाय्याने प्रतिजन, प्रतिपिंड ( antigens and antibodies) ऐवजी थेट रक्तातील संक्रमित जनुके ( DNA/RNA) शोधून काढली जातात.त्यामुळे विंडो पिरीयड कित्येक पटींनी कमी होतो आणि रुग्णास रक्त संक्रमणातून एच.आय.व्ही. विषाणूंचा प्रादुर्भाव व्यावहारिक पातळीवर नष्ट होतो.
नॅट तंत्रज्ञान हे संपूर्णपणे स्वयंचलित असल्याने मानव निर्मित त्रुटी पूर्णपणे टाळल्या जातात. या तपासण्यांसाठी लागणारे सेवाशुल्के प्रयोगशाळा साहित्य, रसायने इत्यादींसाठी लागणारे खर्च लक्षात घेता योग्य सेवाशुल्क घेऊन रक्त व रक्तघटक रक्तपेढीमध्ये उपलब्ध झालेले आहेत. मात्र रक्त संक्रमणामुळे होऊ शकणार्या एच.आय.व्ही. व कावीळ यांच्या औषधोपचारांचा खर्च हे न भरून निघणारे शारीरिक मानसिक नुकसान आहे.
