मुंबईतील एक नामांकित कॉर्पोरेट प्रशिक्षक, व्यवस्थापन सल्लागार आणि प्रेरक वक्ते श्री. जयप्रकाशजी काबरा यांची व्यक्तिमत्त्व विकास या विषयावर रेडक्रॉस जिल्हा शाखा जळगाव यांच्या कर्मचाऱ्यांसाठी एक कार्यशाळा रविवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आली होती. तसेच रेडक्रॉसचे पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य यांच्यासाठी देखील मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते. श्री. जयप्रकाशजी काबरा यांना मनुष्य बळ विकास आणि व्यवस्थापन, मानव संसाधन आणि कॉर्पोरेट प्रशिक्षणांचा ३७ वर्षांपेक्षा अधिक काळाचा समृध्द अनुभव आहे आणि “माईंड मूव्हर्स मॅनेजमेंट कन्सल्टंट्स प्रा. लि. ठाणे” या संस्थेचे ते संस्थापक संचालक आहेत.
त्यांनी भारतामध्ये आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध कॉर्पोरेट कंपन्या, सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रांतील संस्थांमधील कर्मचारी वर्गासाठी आजपर्यंत ५४०० पेक्षा अधिक कार्यशाळा आणि प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीपणे आयोजित केले आहे. देशभरातील २२५ पेक्षा अधिक अग्रगण्य कॉर्पोरेट्स आणि नामांकित व्यवस्थापन संस्थांना मार्गदर्शन केले आहे. रेडक्रॉस भवनात आयोजित केलेल्या कार्यशाळेत प्रामुख्याने कर्मचाऱ्यांमध्ये परिस्थितीनुरूप नेतृत्व, सकारात्मक दृष्टीकोन, आंतरिक मानसिकता परिवर्तन, भावनिक बुद्धीमत्ता आणि परस्पर संवाद, प्रभावी नेतृत्व गुण विकास आणि कार्यनिती, संघ बांधणी यांच्या वाढीसाठी या बाबत त्यांनी कर्मचाऱ्यांना दिशादर्शन केले.
