
इंडियन रेडक्रॉस सोसायटी, जिल्हा शाखा रक्तकेंद्र, जळगाव

संत निरंकारी मंडळ, बोदवड

नेत्र ज्योती हॉस्पिटल, सिंधी कॉलनी, जळगाव
“One Drop of Humanity – Give Blood, Save Lives” “मानवतेचा एक थेंब – रक्तदान करा, जीव वाचवा”
जळगाव, दि. १५ जून २०२६ : जागतिक रक्तदाता दिनानिमित्त दिनांक १४ जून २०२६ रोजी इंडियन रेडक्रॉस सोसायटी, जिल्हा शाखा रक्तकेंद्र, जळगाव यांनी रक्तदान शिबिरांचे आयोजन केले होते. तसेच अनेक रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तपणे रेडक्रॉस रक्तकेंद्रात येऊन रक्तदान करत या मानवतावादी अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मानवतेची सेवा, जीवनरक्षण आणि निस्वार्थ समाजकार्यातील योगदानाचा गौरव करणारा जागतिक रक्तदाता दिन दरवर्षी १४ जून रोजी जगभर साजरा केला जातो. या निमित्ताने रेडक्रॉसतर्फे नागरिकांना रक्तदानाच्या पवित्र कार्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला समाजातील विविध घटकांनी सकारात्मक प्रतिसाद देत रक्तदानाचा प्रेरणादायी आदर्श घालून दिला. संत निरंकारी मंडळ, बोदवड येथे आयोजित रक्तदान शिबिरात ३३ पुरुष व २ महिला, नेत्र ज्योती हॉस्पिटल, सिंधी कॉलनी, जळगाव येथे ४५ पुरुष व ९ महिला, तसेच रेडक्रॉस रक्तकेंद्रात स्वयंस्फूर्तपणे येऊन ३३ पुरुष व २ महिला अशा एकूण १११ पुरुष व १३ महिला मिळून १२४ रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान हे केवळ दान नसून एखाद्या अनोळखी व्यक्तीला नवजीवन देणारे श्रेष्ठ मानवसेवेचे कार्य आहे. एका रक्तदानातून तयार होणाऱ्या विविध रक्तघटकांमुळे तीन ते चार गरजू रुग्णांना जीवनदान मिळू शकते. त्यामुळे रक्तदात्यांनी केलेले हे योगदान समाजासाठी अत्यंत मोलाचे असून मानवतेचा संदेश अधिक दृढ करणारे आहे. रक्तदात्यांनी केलेल्या या उदात्त कार्यामुळे रुग्णांना आवश्यकतेनुसार रक्त व रक्तघटक उपलब्ध करून देणे सुलभ झाले असून रेडक्रॉस रक्तकेंद्राला थोडा दिलासा मिळाला आहे. जागतिक रक्तदाता दिनानिमित्त रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांचे इंडियन रेडक्रॉस सोसायटी, जिल्हा शाखा जळगाव व रेडक्रॉस रक्तकेंद्राच्या वतीने मनःपूर्वक अभिवादन तसेच, शिबिर आयोजाकाप्रती कृतज्ञता व्यक्त करीत आहोत.
