जागतिक महिला दिनानिमित्त रेडक्रॉस मार्फत गरजू एच.आय.व्ही. ग्रस्त महिला भगिनींना किराणा साहित्य भेट.

जागतिक महिला दिनानिमित्त इंडियन रेडक्रॉस सोसायटी जळगाव मार्फत स्माईल फाउंडेशन सामनेरच्या सहकार्याने जळगाव जिल्ह्यातील २७ गरजू व निराधार एच.आय.व्ही. ग्रस्त महिला भगिनींना किराणा साहित्य कीट भेट देण्याचा उपक्रम रेडक्रॉस भवन येथे दिनांक ९ मार्च रोजी आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी रेडक्रॉस उपाध्यक्ष श्री. गनी मेमन, चेअरमन डॉ. मंगला ठोंबरे, सेक्रेटरी श्री. सुभाष सांखला, रक्तकेंद्र चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, रक्तकेंद्र व्हाईस चेअरमन श्री. राजकुमार वाणी, कार्यकारिणी सदस्य श्री. राजेश यावलकर, प्रशासकीय अधिकारी लक्ष्मण तिवारी, स्माईल फाउंडेशन सामनेरच्या श्रीमती मनीषा बागुल, श्री. प्रवीण पाटील व भगिनी उपस्थित होत्या. 

या कार्यक्रमात महिला दिनाच्या शुभेच्छा देताना चेअरमन डॉ. मंगला ठोंबरे यांनी रेडक्रॉस मार्फत भविष्यातही नेहमीच आवश्यक सहकार्य करण्याचे आश्वासन देत हिम्मतीने आयुष्य जगण्याचा सल्ला दिला. उपाध्यक्ष गनी मेमन यांनी  प्रत्येक महिला ही समाजाचा भक्कम पाया असून प्रत्येक दिवस हा तिचाच आहे, तिला कायम सन्मानाने वागवण्यातच खरा महिला दिवस साजरा होईल अशा भावना व्यक्त केल्या. उपस्थितांच्या हस्ते सर्व भगिनींना किरण साहित्य, बादल्या, साड्या इत्यादी कीट भेट देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन जनसंपर्क अधिकारी सौ. उज्वला वर्मा यांनी केले आणि श्रीमती मनीषा बागुल यांनी रेडक्रॉसचे आभार व्यक्त केले.